हिंगोली : जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून सलग तिसऱ्या दिवशी सोमवारी रात्री, तसेच मंगळवारी दिसवभर पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपले. तब्बल २० मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली असून प्रमुख नद्यांसह ओढ्यांना पूर आला आहे. तीन दिवसांत पुराच्या पाण्याने तिघांचा बळी घेतला, तर एकाचा शोध सुरू आहे. सोमवारी रात्री झालेल्या पावसाचे पाणी लहान पुलांवरून वाहत असल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे.
जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. सोमवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्रभर बरसला. या पावसामुळे कयाधू, पैनगंगा, जलेश्वर नदी दुथडी भरून वाहत होती. मंगळवारी दिवसभर या नदीचा पूर ओसरला नव्हता. सेनगाव तालुक्यातील बरडा येथे पुरात एकजण वाहून गेला. डोंगरकडा येथे काही ग्रामस्थांच्या घरात पाणी घुसले, तसेच जामगव्हाण व उमरा ते बोल्डा रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मंगळवारीही जिल्ह्यात अनेक भागांत जोरदार पाऊस कोसळला. दरम्यान, मंगळवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात ६६.२० मिमी पावसाची नोंद झाली. यात हिंगोली तालुक्यात ७२.१० मिमी, कळमनुरी ८१.३०, वसमत ७३.६०, औंढा ७७.६० मिमी अशी या चार तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याचे पहावयास मिळाले. केवळ सेनगाव तालुक्यात सर्वांत कमी २७.९० मिमी पाऊस झाला आहे.
वारंगा फाटा मंडळात सर्वाधिक पाऊस
जिल्ह्यातील ३० महसूल मंडळांपैकी २० मंडळाला पावसाने चांगलेच झोडपले. यात सर्वाधिक पाऊस कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा मंडळात झाला. मंगळवारपर्यंत मागील २४ तासांत मंडळानिहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे (पाऊस मिलीमीटरमध्ये) - हिंगोली तालुका : हिंगोली ५८.०, नर्सी नामदेव ७८.०, सिरसम ८०.३, बासंबा ६२.३, डिग्रस ६८.०, माळहिवरा ८२.८, खांबाळा ७५.३ कळमनुरी तालुका : कळमनुरी ३४.३, वाकोडी ६७.८, नांदापूर ५३.८, आखाडा बाळापूर ९१.८, डोंगरकडा १०८.८, वारंगा १३१.० वसमत तालुका : वसमत ६७.८, आंबा ७९.५, हयातनगर ६७.३, गिरगाव ७२.३, हट्टा ६६.५, टेभूर्णी ७६.०, कुरूंदा ८६.०, औंढा तालुका : औंढा ९२.८, येहळेगाव ६८.३, साळणा ६९.५, जवळा बाजार ७९.८ सेनगाव तालुका : सेनगाव ३१.५, गोरेगाव ३६.८, आजेगाव ३९.८, साखरा २०.३, पानकनेरगाव २९.८, हत्ता ९.३