कोरोनामुळे मागील वर्षभरापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. याला पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जात आहे. मात्र ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थी लेखन करण्याचे विसरत चालले आहेत. वळणदार हस्ताक्षर येत नसून लिहण्याची गतीही मंदावत आहे. दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा जवळ आली असून परीक्षेतील सर्व प्रश्न सोडविता येणार की नाही, याची चिंता विद्यार्थ्याांसह पालकांना लागली आहे. यासाठी पालक आता हस्ताक्षर सुधारण्यासह लेखनाची गती कशी वाढविता येईल,यासाठी प्रयत्न करीत आहेत. काही उपक्रमशील शिक्षकही हस्ताक्षर सुधारण्यासाठी गृहपाठावर भर देत आहेत. दररोज लिखान करण्यासाठी देत आहेत. यातून हस्ताक्षर सुधारण्याचा प्रयत्न होत असला तरी लिहण्याची गती कशी वाढवायची हा प्रश्न कायम राहत आहे.
विद्यार्थ्यांनो हे करा !
१) वेळ लावून पेपर सोडविण्याचा प्रयत्न करावा.
२) लिखान करण्यापूर्वी हाताचा पंजा, स्नायूचे व्यायाम करणे, उंचीनुसार योग्य टेबल, खुर्चीचा वापर करावा.
३) दिवसभरात किमान आठ ते दहा पाने लिखानाचा सराव करावा.
मराठी विषयांचे तज्ज म्हणतात...
हस्ताक्षर सुधारण्यासाठी नियमित सराव करणे आवश्यक आहे. त्याच बरोबर मुळाक्षरे, त्याचा आकार, वेलांटी, रफार आदींकडे लक्ष दिल्यास अक्षर वळणदार होण्यास मदत होईल.
-के.पी. कामशेट्टी, जि.प. शिक्षक
कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणामुळे लेखन कौशल्यावर परिणाम होत असला तरी लेखनाचा नियमित सराव केल्यास हस्ताक्षर सुधारते. दररोज किमान आठ ते दहा ओळीचे लिखान करावे.
-संताेष खंदारे, जि.प. शिक्षक, काळकोंडी
ऑनलाईन अभ्यासामुळे हस्ताक्षर बिघडत आहे. लिहण्याची गतीही मंदावत चालली आहे. लिहण्याचा सराव नसल्याने हात दुखत असल्याच्या तक्रारी पाल्य करीत असून ऑनलाईनमुळे डोळ्यावरही परिणाम हाेत आहे.
- बापू सुर्यवंशी, पालक
ऑनलाईन अभ्यासामुळे मुले लिहण्याचा सराव विसरले आहेत. हस्ताक्षरही बिघडले असून गती कमी झाली आहे. त्यामुळे लेखी परीक्षेची चिंता लागली आहे.
-माधव मारकळ. पालक, दांडेगाव