हिंगोली : जिल्ह्यात काेरोनाचा कहर कमी झाल्यानंतर जवळपास २०० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले होते; मात्र ज्या ६६ जणांना कायम ठेवले. त्यांना तीन महिन्यांपूर्वीच घेतलेले असल्याने आमच्यावर अन्याय झाल्याची भावना सुरुवातीपासूनच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्याने आता ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना नियुक्तीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी मागविला आहे.
हिंगोली जिल्ह्यात जवळपास साडेतीनशेपेक्षा जास्त कंत्राटी कर्मचारी आरोग्य विभागाने कोरोना काळात कामावर घेतले होते. यापैकी काहींना शासन आदेश आल्यानंतर पहिल्याच टप्प्यात कार्यमुक्त केले होते. त्यानंतर दोन महिन्यांनी पुन्हा २०० कर्मचाऱ्यांना कमी केले; मात्र हे करताना नवीन कोविड सेंटर येथील सर्व स्टाफ व डॉक्टरांना जशास तसे ठेवले होते. यापैकी अनेक जण चार ते पाच महिन्यांपूर्वीच रुजू झालेले होते. त्यामुळे जे कंत्राटी कर्मचारी मागील दीड ते दोन वर्षांपासून काम करीत आहेत, अशांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदविला. कोणत्या आधारावर आम्हाला कमी केले? असा सवाल केला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.राजेंद्र सूर्यवंशी व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार यांना ज्येष्ठता यादी तयार करून ज्यांनी सर्वांत आधी कोरोना काळात सेवा देण्यास सुरुवात केली, अशांना आधी संधी देण्यास सांगितले. त्यानुसार नवा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. तर जे ६६ जण सध्या कार्यरत आहेत, त्यांना आता काम थांबवावे लागणार असल्याचे दिसत आहे.