हिंगोली : येत्या तीन दिवसांमध्ये महावितरण वीज थकबाकीदारांच्या विरुद्ध विशेष मोहीम राबविणार आहे. या मोहिमेत वीज बिल भरले नाही तर ‘त्या’ ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी दिला आहे.
येत्या १४, १५ आणि १६ सप्टेंबरपासून हिंगोली शहरात ही विशेष मोहीम राबविली जाणार आहे. आजमितीस घरगुती, वाणिज्य आणि औद्योगीकचे थकबाकीदार ३ हजार ४३६ एवढे आहेत. या वीज ग्राहकांकडे १८८.०४ लाख एवढी थकबाकी आहे. सदरील थकबाकीदारांनी बाकी भरली तर महावितरणला त्यांचा वीज पुरवठा सुरू ठेवणे शक्य होणार आहे. अन्यथा नाइलाजाने त्यांची वीज खंडित करावी लागणार आहे.
ही विशेष मोहीम प्रभारी अधीक्षक अभियंता रजनी देशमुख, कार्यकारी अभियंता संजयकुमार चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता दिनकर पिसे, उपकार्यकारी अभियंता अब्दुल जब्बार, सहायक अभियंता सरोज चंदनखेडे, सहायक अभियंता सचिन बेलसरे, सहायक अभियंता रवींद्र व्यवहारे, सहायक अभियंता रहीम शेख, सहायक अभियंता रेड्डी, सहायक अभियंता खोगरे व पथकामार्फत राबविली जाणार आहे.
सुटीच्या दिवशीही केंद्र राहणार सुरू...
ग्राहकांच्या सोयीकरिता सुटीच्या दिवशीही वीज बिल भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहे. तेव्हा वीज ग्राहकांनी आपली वीज थकबाकी वेळेवर केंद्रात येऊन भरावी आणि रितसर पावती घेऊन जावी.
- दिनकर पिसे, उपकार्यकारी अभियंता
अशी आहे ग्राहक संख्या व थकबाकी...
१) घरगुती : ग्राहक संख्या २,७२३
थकबाकी रु. १२७.२९ लाख
२) वाणिज्य : ग्राहक संख्या ४१०
थकबाकी रु. २०.२७ लाख
३) औद्योगिक : ग्राहक संख्या ३०३
थकबाकी रु. ४०.४८ लाख