हिंगोली : कोरोना महामारी कमी झाली नसल्यामुळे सर्व नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळत सण, उत्सव साजरे करावेत, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. परंतु, गणेशचतुर्थीच्या पूर्वसंध्येलाच शहरातील मुख्य बाजारात गर्दीने उच्चांक गाठल्याचे पाहायला मिळाले.
श्री गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी हरितालिका सण असल्यामुळे त्याच्या खरेदीसाठीही महिलांची बाजारात गर्दी दिसून आली. शहरातील गांधी चौक, इंदिरा चौक, महावीर चौक, जवाहर रोड, नांदेड नाका, आदी भागांत ग्रामीण भागातून हरितालिका व गणेशचतुर्थीचे साहित्य घेऊन छोटे विक्रेते दाखल झाले होते. दुर्वा, आघाडा, केळीचे खांब, मक्याचे कणीस, कमळ, विविध प्रकारच्या वेली विक्रेत्यांनी आणल्या होत्या. श्री गणेशाची स्थापना १० सप्टेंबर रोजी माध्यान्हकाली करावयाची असल्यामुळे अनेकांनी हरितालिकेलाच छोटा-मोठा गणपती खरेदी केला. सार्वजनिक मंडळाच्या गणपतीची उंची ४ फूट व घरगुती गणपतीची उंची २ फूट पाहिजे, अशा सूचना शासनाच्या आहेत. परंतु, बाजारात यापेक्षाही मोठे गणपती पाहायला मिळाले. श्री गणेशाबरोबर श्री महालक्ष्मी व महालक्ष्मी पिलवंडांचे मुखवटेही व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी आणले होते.
दीड वर्षापासून मूर्ती घरातच...
गत दीड-दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे गणेश व महालक्ष्मीच्या मूर्ती बाहेर काढता येत नाहीत. त्यामुळे व्यवहार ठप्पच आहे. यावर्षी कोरोना महामारी कमी झाल्यामुळे महिनापूर्वीपासूनच शासनाने अनलॉक केले आहे. शासनाने कोरोना नियम पाळा असे सांगितल्यामुळे नियमांचे पालन करीत मूर्ती विक्रीसाठी स्टॉल टाकले आहे. शहरात जवळपास ३० विक्रेत्यांनी गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल टाकले आहेत.
- दीपक बनरूले, विक्रेता
फोटो