हिंगोली: वाशिम, सेनगाव आणि औंढा या भागात अवैध वाहतूक वाढली आहे. परिणामी, एसटी महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. सदरील अवैध वाहतूक बंद करण्यात यावी, अशी विनंती हिंगोली आगाराने केली, परंतु अद्याप तरी याकडे कानाडोळाच केला जात आहे.
वाशिम, सेनगाव आणि औंढा ही स्थानके उत्पन्नाच्या बाबतीत चांगली आहेत, परंतु या भागात अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात बोकाळली आहे. अवैध वाहतुकीवाले बस स्थानकात येऊन बस स्थानकातील शांतता भंग करून प्रवासी घेऊन जात आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात घट होत आहे. सेनगाव, वाशिम आणि औंढा या भागात सुरू असलेली अवैध वाहतूक बंद करण्यात यावी, अशी मागणी हिंगोलीचे स्थानक प्रमुख संजयकुमार पुंडगे यांनी एक निवेदन देऊन केली आहे, परंतु निवेदनाची अजून तरी दखल घेतली नाही, असे पुंडगे यांचे म्हणणे आहे.
लॉकडाऊन खुला केल्यानंतर एसटी महामंडळाने सर्वच ग्रामीण भागात बसेस सुरू केल्या आहेत. त्यातच आत अवैध वाहतुकीने डोके वर काढले आहे. प्रत्येक बस स्थानकात ‘नो पार्किंग’ झोन लावलेला असतानाही अवैध वाहतुकीवले मात्र याला जुमानत नाहीत. संबंधित विभागाने याची दखल घेऊन परिसरातील अवैध वाहतूक बंद करावी, अशी मागणी महामंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.