हिंगोली : जिल्ह्यात जानेवारी ते ऑक्टोबर २०२० या १० महिन्यांमध्ये जिल्ह्यात विविध ठिकाणी ३८ अपघात झाले. या अपघातांत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील वाहनचालकांनी हेल्मेट वापरले असते तर त्यांचे प्राण वाचले असते. हेल्मेट न वापरल्यामुळे १७ जणांना प्राणास मुकावे लागले आहे.
अपघात झाला की, जास्त करून मेंदूला मार लागतो. हे पाहून शासनाने प्रत्येक वाहनचालकांना हेल्मेट सक्तीचे केलेले आहे; परंतु कोणीही त्याचा वापर करताना आढळून येत नाही. आजमितीस मोठे शहर वगळता इतर छोट्या शहरात तर हेल्मेटची सक्तीही केलेली पाहायला मिळत नाही. बहुतांश वेळा हेल्मेटच्या नावाखाली दंड आकारला जातो. नंतर मात्र त्याचे काहीही होत नाही. जिल्ह्यातील कलगाव वळण रस्ता तर अपघाताचे केंद्रच बनले आहे. या ठिकाणी वाहनांची वर्दळही मोठ्या प्रमाणात असते. दुचाकीबरोबरच इतर मोठी अवजड वाहनेही बेफामपणे चालविली जात आहेत. या ठिकाणी पोलीस चौकीची आवश्यकता आहे.