लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींची निवड बिनविरोधपणे पार पडली. यात सभापतीपदी उत्तम आसोले तर उपसभापतीपदी नामदेव राठोड यांची निवड झाली आहे.पंचायत समितीच्या सभागृहात पीठासीन अधिकारी अतुल चोरमारे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया दुपारी १२ वाजता सुरू झाली. यात आसोले व राठोड यांचा एकमेव अर्ज विहित वेळेत दाखल झाला होता. छाननीत हे दोन्ही अर्ज वैध ठरले. त्यामुळे या दोघांची बिनविरोध निवड झाली. या प्रक्रियेसाठी पंचायत समितीच्या २0 पैकी १६ सदस्यांनी हजेरी लावली होती. भाजपच्या तीन सदस्यांसह एक अपक्ष गैरहजर होता. यात अंजली सुशिल गायकवाड, शीला रुस्तुमा जगताप, लोपमुद्रा बद्रीनाथ टेकाळे व अपक्ष मीना संजय घुगे यांचा समावेश आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी सहायक पीठासीन अधिकारी म्हणून बीडीओ ए.एल. बोंदरे यांच्यासह सहा. बीडीओ डुकरे यांची उपस्थिती होती.हिंगोली पंचायत समितीत शिवसेना ८, काँग्रेस-६, भाजप-३, राष्ट्रवादी-१, रासप-१, अपक्ष-१ असे पक्षीय बलाबल आहे. मागच्या वेळी सत्तास्थापन करताना शिवसेनेने भाजप अथवा इतरांना सोबत घेण्याऐवजी क्रमांक दोनच्या काँग्रेसशी युती केली. यात सव्वा वर्षासाठी सभापतीपद सेनेकडे तर नंतरचे सव्वा वर्षे काँग्रेसला देण्याचे ठरले होते. त्यामुळे सुरुवातीला सेनेचे विलास काठमोडे व काँग्रेसच्या कावेरी कºहाळे यांनी ही पदे भूषविली. आता सव्वा वर्षांनंतर काँग्रेसचे आसोले व शिवसेनेचे राठोड यांना संधी मिळाली आहे. आसोले फाळेगाव तर राठोड पेडगाव गणातून निवडून आले आहेत. एक गण हिंगोली तर दुसरा कळमनुरी मतदारसंघातील आहे.---आतषबाजी : कार्यकर्त्यांची गर्दीएरवी पंचायत समितीत कार्यकर्त्यांची गर्दी होत नाही. पूर्वीसारखा पंचायत समितीला निधीच राहिला नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. मात्र पदाधिकारी निवडीच्या निमित्ताने ग्रामीण भागातील कार्यकर्ते परिसरात मोठ्या संख्येने हजर असल्याचे दिसून येत होते. निवडीनंतर फटाक्यांची आतषबाजी केली. सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर, माजी जि.प.उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड यांनी नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या निवासस्थानीही नवनिर्वाचितांचा सत्कार करण्यात आला.---चोख बंदोबस्तपंचायत समितीत पदाधिकारी निवडीप्रसंगी परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहने परिसराच्या ठरावीक मर्यादेबाहेर उभी करण्यास सांगितले जात होते.
हिंगोली पंचायत समितीच्या सभापती आसोले, उपसभापती राठोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 01:12 IST