हिंगोली जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पक्षीय चिन्हावर लढल्या जात नसल्या तरीही बड्या पुढाऱ्यांचे निष्ठावंतच त्यांचे प्रतिनिधी म्हणून गावपातळीवर काम करीत असतात. याचा परिणाम म्हणून प्रत्यक्ष राजकीय पक्षांचा सहभाग नसला तरीही राजकीयदृष्ट्या गावातील निवडणुकीचे निकालही तेवढेच महत्त्वाचे असतात. या निवडणुकीत जवळपास सर्वच जि.प. पदाधिकाऱ्यांच्या सर्कलमध्ये निवडणुका आहेत. आगामी जि.प. व पं.स. निवडणुकांत फायदेशीर लोकांसाठी ही मंडळी काम करील, असे दिसते.
जिल्हा परिषद अध्यक्षांचा पेडगाव गट
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले यांचा मूळ गट खेर्डा असला तरीही ते आरक्षणामुळे पेडगाव गटात लढले व ४०० मताधिक्याने निवडून आले. आता या दोन्ही गटांतील जवळपास २४ ते २५ ग्रामपंचायतींची निवडणूक आहे. शिवसेना व काँग्रेसचे प्राबल्य असलेला हा भाग आहे. बेले यांच्या खेर्डावाडी गावात कायम बिनविरोध निवड होते. यंदा खेर्डा ग्रा.पं. बिनविरोधच्या हालचाली सुरू आहेत.
जि.प. उपाध्यक्षांचा येहळेगाव सोळंके गट
येहळेगाव सोळंके गटातून आधी पत्नी व आता स्वत: ७५० मताधिक्याने निवडून आलेले मनीष आखरे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या म्हाळसापूर गावात यावेळीही बिनविरोधसाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ताब्यात अनेक ग्रामपंचायती आहेत. यावेळी बिनविरोधचे प्रयत्न अनेक ठिकाणी होत असून, यात यश न आल्यास लढती होतील.
शिक्षण सभापतींचा हट्टा जि. प. गट
हट्टा जि.प. गटातून १८० च्या मताधिक्याने निवडून आलेल्या रत्नमाला प्रभाकर चव्हाण यांच्या गटातील सात ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. त्यांचे गाव असलेल्या तुळजापूरवाडीत मागच्या वेळी बिनविरोध निवडणूक झाली. यंदाही तेच प्रयत्न आहेत. इतरत्र सेना, भाजप व राकाँमध्ये लढती दिसत आहेत.
समाजकल्याण सभापतींचा खरवड गट
समाजकल्याण सभापती फकिरा मुंडे हे खरवड गटातून ६५० मतांनी निवडून आले. मात्र, त्यांचे हिवरा बेल गाव कोथळज गटात येते. येथे बिनविरोध निवड होते. मात्र, एका प्रभागात निवडणुकीची शक्यता आहे. खरवडमध्ये शिवसेना व काँग्रेसमध्येच लढती पाहायला मिळतात.
महिला व बालकल्याण सभापतींचा गोरेगाव गट
जिल्ह्याची राजकीय राजधानी मानल्या जाणाऱ्या गोरेगाव जि.प. गटाच्या रूपाली पाटील या हजारावर मतांनी निवडून आल्या आहेत. या गावात ग्रा.पं.मध्ये त्यांचे प्राबल्य आहे. मात्र, यंदा शिवसेना व काँग्रेसला मिळून भाजपशीही लढत द्यावी लागेल, असे दिसते, तर सर्कलमध्ये इतरत्र सेना व काँग्रेसच्या लढतींची शक्यता आहे.