हिंगोली शहरात मागील तीन वर्षांपासून घंटागाड्या सुरू आहेत. आता त्यात नियमितपणा आला आहे. शहरातील विविध भागात २० तर १ मुख्य बाजारपेठेसाठी घंटागाडी आहे. आता ओला व सुका कचरा वेगळा करून देण्याची नागरिकांना सवय लागली असली तरीही हे प्रमाण ६० ते ७० टक्केच आहे. इतरांनीही असे वर्गीकरण करण्याचे आवाहन नगरपालिकेकडून करण्यात आले. बायोमेडिकल वेस्टसाठी स्वतंत्र संस्था असून ती अनेकदा कचरा उचलत नसल्याची बोंब आहे. मात्र, ती इतर जिल्ह्याची असल्याने तरणोपाय नाही.
जमा केलेल्या कचऱ्यापासून खत व वर्गीकरण
जमा करण्यात आलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण केलेले नसल्यास ते वाहनतळावर केले जाते. त्यानंतर इंदिरा खुले नाट्यगृह, भाजीमंडई, देवडानगर येथील उद्यानात असलेल्या खतनिर्मिती प्रकल्पात ओला कचरा पाठवून दिला जातो. तेथे खत बनते.
सुका कचरा हा शहराबाहेर असलेल्या लिंबाळा येथील डंम्पिंग ग्राऊंडला पाठविण्यात येतो. या कचऱ्याचे तेथे पुन्हा वर्गीकरण होते. त्या ठिकाणी लोखंड, काच, प्लास्टिक अशा घातक बाबींचे वर्गीकरण केले जाते.
प्लास्टिक, लोखंड, काच आदी जे जमा होते. त्यातून ज्या बाबींची विक्री करणे शक्य आहे, त्याची विक्री केली जाते. तर उर्वरित सर्व माल घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी असून त्याची विल्हेवाट लावली जाते.
वॉच ठेवण्यासाठी जीपीएस यंत्रणा
हिंगोली शहरातील सर्व २१ घंटागाड्यांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. तर प्रत्येक गाडीसाठी त्यांचा भागही ठरवून दिला आहे. त्या भागात फिरणे अनिवार्य आहे. जर एखादे वाहन बंद पडले तर इतर वाहनांकडून या भागातील कचरा उचलण्यास सांगितला जातो. मात्र, कधीतरी ते शक्य झाले नाही तर अशा भागात तेवढा खंड पडतो.
शहरात नियमितपणे घंटागाडी फिरवून कचरा संकलनाचे काम केले जाते. त्यात खंड पडू नये, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. जीपीएसद्वारे त्यावर लक्ष ठेवले जाते.
-बाळू बांगर, स्वच्छता निरीक्षक