औंढा नागनाथ : तालुक्यातील बहुतांश भाग डोंगराळ असून यामध्ये मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचा वावर आहे. हजारो हेक्टर शेती वनविभागाला लागूनच असल्याने जंगलातील वन्यप्राणी शेतातील उभ्या पिकांची नासाडी करीत आहेत. यासाठी शेतकऱ्यांकडून वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी वारंवार मागणी करूनही वनविभागाच्या वतीने याकडे दुर्लक्ष होत आहे.
औंढा नागनाथ तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली आहे. रबी हंगामातील गहू, हरभरा, टाळकी, ज्वारी, तूर, कापूस, करडई आदी पिकांचा पेरा करण्यात आला आहे. आता हे सर्व पिके वाऱ्यावर डोलत असताना वन्यप्राणी हरिण, निलगाय, रानडुक्कर या प्राण्यांकडून शेतशिवारामध्ये धुमाकूळ घालून रात्रीच्या वेळेला पिकांची नासाडी करत आहेत. त्यामुळे शेतकरी वन्यप्राण्यांना वैतागले आहेत. शेतकऱ्यांनी वारंवार वनविभागाला तोंडी व लेखी तक्रार करूनही वनविभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे.
तालुक्यातील सिरला, कोडशी, गोजेगाव, केळी, उंडेगाव, चिंचोली, सिद्धेश्वर, जामगव्हाण, आमदरी, राजदरी, पिंपळदरी, औंढा नागनाथ, दुधाळा तांडा, जवळा बाजार, नागेशवाडी, काठोडा, अंजनवाडा महादेव, तुर्क पिंपरी, सुरेगाव, ढेगज, वडचुना, दुरचुना, गांगलवाडी, सेंदुरसना, शिरडशहापूर, मार्डी, उमरा, सारंगवाडी, जांब, राजापूर, सुरवाडी, सुरेगाव, अंजनवाडी, गोळेगाव, जडगाव, बोरजा, पिंपळा, असोला, काकाडदाभा, जलालदाभा भागामध्ये वन्यप्राणी असल्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान करत आहेत. त्यामुळे शेतकरी वैतागला आहे. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गांतून वन विभागाकडे वारंवार करण्यात आली आहे. वन विभागाने बंदोबस्त करण्यासाठी काहीही पाऊल उचले नाही.
आमच्या शिवारामध्ये हरभरा, गहू, ज्वारी पिकांचा पेरा जास्त आहे. वन्यप्राणी रात्रीच्या वेळेला पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करत आहेत. हा सततचा त्रास असल्याने पार वैताग आला आहे. यामुळे या वन्यप्राण्यांचा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा.
-अनिल लोंढे, शेतकरी, लाख
फाेटाे नं १०