हिंगोली : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना आधार देण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत आतापर्यंत ८० बालकांना प्रतिमहिना ११०० रुपये देण्यात येत आहे. जिल्ह्यात एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या १३२ असून ३ बालकांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढली होती. आतापर्यंत १६ हजार २९ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी १५ हजार ६३७ रुग्ण बरे झाले असले, तरी ३९२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. कोरोनाने अगोदरच रोजगारासह विविध प्रश्न निर्माण झाले होते. त्यात ० ते १८ वर्षे वयोगटातील १३५ बालकांचा आधारच निघून गेल्याने त्यांच्यासमोर भविष्याचा प्रश्न उभा ठाकला होता. त्यामुळे एकाच कुटुंबातील दोन्ही पालकांचा आई आणि वडील यांचा मृत्यू झाल्यामुळे अनाथ झालेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांच्या संगोपनासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स गठीत करण्यात आले आहे. कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची माहिती संकलित करणे. बालकांना सर्वतोपरी संरक्षण उपलब्ध करून देणे. अशी बालके बालकामगार, बालभिक्षेकरी, अनैतिक मानवी वाहतूक, मानवी तस्करी, बेकायदेशीर दत्तकविधान यास बळी पडणार नाहीत, याची काळजी घेणे आदी जबाबदाऱ्या या टास्क फोर्सवर सोपविण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यात महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले होते. जिल्ह्यात जवळपास १३२ बालकांनी आई किंवा वडील यापैकी एक पालक गमावल्याचे स्पष्ट झाले. तसेच ३ बालकांनी आपले दोन्ही पालक गमावल्याचे समोर आले होते.
५५ बालकांना मदतीची प्रतीक्षा
पालक गमावलेल्या ८० बालकांना महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने प्रत्येक महिन्याला रुपये ११०० बालसंगोपनासाठी देण्यात येत आहेत. या बालकांना मदत मिळाली असली, तरी अजूनही ५५ बालकांना या मदतीची प्रतीक्षा असल्याचे समोर आले आहे. या बालकांनाही लवकरच मदत दिली जाणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागातून देण्यात आली.
...तर बालगृह, शिशुगृहात दाखल करण्यात येईल
पात्र बालकांसाठी योजनेंतर्गंत देय असणारी रक्कम त्या बालकांसाठी खर्च न करता इतर प्रयोजनासाठी त्याच्या पालक, नातेवाइकांकडून खर्च केली जात असल्याचे व त्या बालकाकडे दुर्लक्ष केले जात असल्याची बाब निदर्शनास आल्यास त्या बालकाला काळजी व संरक्षण मिळावे, यासाठी बालगृह, शिशुगृहात दाखल करण्यात येणार आहे.