हिंगोली जिल्ह्यातील हा रस्ता अनेकदा वादाचा विषय ठरला आहे. यापूर्वीही या रस्त्याचे काम अर्धवट सोडल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. पुलाच्या कामावरूनही अनेकदा नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. तसेच इतर अनेक जणांनी या रस्त्याबाबत तक्रारी केल्या होत्या. हे कामही अनेक दिवस रखडून पडल्याने चर्चेचा विषय ठरले होते. त्यानंतर हे काम पूर्ण तर झाले. मात्र, या रस्त्याची अवघ्या दोनच वर्षांत वाट लागली आहे. याबाबत संबंधित कंत्राटदार पुन्हा आपले उत्तरदायित्व दाखवायला तयार नाही. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत पाच वर्षांपर्यंत संबंधित कंत्राटदाराकडेच दुरुस्तीची जबाबदारी आहे. मात्र, या रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आ.तान्हाजी मुटकुळे यांनीच याबाबतची तक्रार केली आहे. त्यामुळे आतातरी दुरुस्ती होईल का? हे पाहणे रंजक ठरणार आहे.
याबाबत मुख्यमंत्री ग्रामसडकचे उपकार्यकारी अभियंता एस. एम. कुलकर्णी यांना विचारले असता ते म्हणाले, ही तक्रार आम्हाला मिळाली आहे. याबाबत संबंधित कंत्राटदाराला दुरुस्तीसाठी आदेशित केले आहे. लवकरच हे दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.