नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. कुरवाडे यांनी अर्थसंकल्प सादर केला. यात प्रारंभिक शिल्लक ५.१७ कोटींची असून महसुली उत्पन्न २९.७० कोटी, भांडवली जमा ७६.४० कोटी अपेक्षित आहे. असे एकूण १११.२७ कोटी जमा होणे अपेक्षित आहे. तर महसुली खर्च २९.६५ कोटी व भांडवली खर्च ८१.५७ कोटी अपेक्षित आहे. एकूण खर्च १११.२२ कोटी अपेक्षित असल्याने ४.८० लाखांचा शिलकी अर्थसंकल्प असल्याचे सांगण्यात आले. यात गटारे व नाली दुरुस्तीसाठी २० लाख, रस्ता दुरुस्ती १५ लाख, शौचालय दुरुस्ती १५ लाख, नाली व ढापे बांधकाम २० लाख, ढापे बांधकाम १५ लाख, हिंगोली उत्सव ३ लाख, रिंगण सोहळा, शिवजयंती, डॉ.आंबेडकर जयंती २० लाख, नाली बांधकाम १५ लाख, रस्ता बांधकाम १० लाख, पोल शिफ्टिंग ३० लाख, बोअरवेल घेणे १० लाख अशा काही ठळक बाबी आहेत. यावेळी शिवसेना वगळता इतर बहुतांश नगरसेवकांची उपस्थिती होती. तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते.
पाणीपट्टीमध्ये केली वाढ
मागील अनेक वर्षांपासून मालमत्ता कर व पाणीपट्टीत वाढ झाली नाही. मालमत्ता करात वाढ करणे तूर्त लांबणीवर पडले असले तरीही पाणीपट्टी ९०० रुपयांवरून दीड हजार रुपयांवर नेली आहे. प्रतिवर्षी पाणीपुरवठ्यावर ४ ते साडेचार कोटी रुपये खर्च होतात. तर २ कोटी रुपयांपर्यंतच वसुली होते. त्यामुळे २ कोटींची तूट होत असल्याने न.प.ने हा निर्णय घेतला आहे.
विकासकामे रखडल्याने सेनेचा बहिष्कार
हिंगोली शहरातील अनेक विकास कामे रखडली आहेत. अनेक कामे योग्य दर्जा ठेवून केली जात नाहीत. शिवाय भूमिगत गटार योजनेचे काम अर्धवट ठेवून कंत्राटदाराला पूर्ण देयक देवून पळवून लावण्याचा घाट घातला जात आहे. रस्त्यांची आताच वाट लागली. अनेक कामांचे पितळ उघडे पडले आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही कोणी दखल घेत नाही. त्यामुळे आज शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकल्याचे सेना गटनेते श्रीराम बांगर यांनी सांगितले.
सर्व विकासकामे डोळ्यासमोर
न.प.त भाजपची सत्ता आल्यापासून ८० कोटींची भूमिगत गटार, १०० कोटींचा रस्ते प्रकल्प, ९ कोटींची न.प. इमारत, गोपीनाथ मुंडे शेतकरी भवन, शिवाजीराव देशमुख सभागृह, नाट्यगृह असे इतर ७० कोटींपेक्षा जास्त रक्कमेची कामे सुरू आहेत. बक्षीसरुपानेच आठ कोटी मिळाले. सेनेला हा विकास का दिसत नाही? सभागृहात ही मंडळी आलीच नाही. त्यांचे म्हणनेही मांडले नाही. त्यामुळे त्यांचा बहिष्कार कशासाठी ? हे त्यांनाच माहिती अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी दिली.