बासंबा फाटा - गावापर्यंतचा रस्ता उखडला
बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा गावापासून बासंबा फाटा या मुख्य रस्त्याची दुरावस्था मागील बऱ्याच दिवसांपासून झाली आहे. या रस्त्यावर मोठाले खड्डे व गिट्टी उघडी पडल्याने याठिकाणी सदैव धुळीचे वातावरण राहत आहे. गावातील अनेक नागरिक हिंगोलीत कामासाठी जात असतात. यासाठी दररोजच्या या नागरिकांना या रस्त्यावरील गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. यासाठी गावापासून ते फाट्यापर्यंतच्या रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.
नर्सी येथे पिकविम्याचे वाटप
नर्सी नामदेव : हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव या ठिकाणी खरीप पीक विम्याचे अनुदान वाटप करण्यात येत आहे. नर्सी व परिसरात मागील सहा महिन्यापूर्वी अतिवृष्टी होऊन खरीप पिकाच्या सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. यासाठी अनेक शेतकऱ्यांनी या पिकांचा पिकविमा उतरविला होता. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सध्या जिल्हा परभणी मध्यवर्ती बँकेमध्ये सन २०१९ - २० या वर्षाचा पिकविमा कंपनीकडून मंजुर झाला आहे. त्याचे अनुदान नर्सी येथील बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहे. या पिकविम्याचे वाटपही शेतकऱ्यांना करण्यात येत आहे.
पुसेगावात घाणीचे साम्राज्य
पुसेगाव : सेनगाव तालुक्यातील पुसेगावातील अनेक भागामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामध्ये पुसेगाव येथील बसस्थानक, जिल्हा परिषद प्रशाला व गावातील उपकेंद्राचा समावेश आहे. याठिकाणी अनेक गावकरी घरातील कचरा टाकीत असून याठिकाणी मोठमोठाले उकीरडे निर्माण झाले आहे. तसेच या भागात नाल्याही नसल्याने सर्व सांडपाणी रस्त्यावर साचून याची दुर्गंधी गावात पसरत आहे. यामुळे अनेक नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. याकडे संबंधीत विभागाने लक्ष देणे गरजेचे बनले आहे.
तुरी झाल्या झाडण्या
पुसेगाव : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव व परिसरातील तुरीचे पीक मोठ्या प्रमाणावर उधळल्या गेले आहेत. यामुळे तुरीचे झाडे केवळ झाडण्या बनले आहे. यामध्ये गावासह खुडज, वरुड काजी, जांभरुन आंध, आडोळ, खिल्लार यासह परिसरातील अनेक गावातील तुरीचे पीक उधळल्या गेले आहेत. यामुळे आता हे वाळलेले तुरीचे झाड झाडण्या म्हणून वापरण्या योग्यच राहीले आहे.
वन्य प्राण्याचा उपद्रव वाढला
सवना : सेनगाव तालुक्यातील सवना गावाच्या शेतशिवारातील पिके चांगलीच बहरली आहेत. पण या पिकांवर वन्य प्राणी ताव मारुन मोठी नासाडी करीत असल्याने शेतकरी चिंतेत आला आहे. येथील शेतशिवारामध्ये निलगायी व वानराची टोळी गहु व हरभरा पिकाचे मोठे नुकसान करीत आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना शेतात दिवस - रात्र जागरण करुन या प्राण्यांवर देखरेख ठेवावी लागत आहे. यासाठी या वन्य प्राण्याच्या वाढत्या उपद्रवावर आळा घालण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
रस्त्यावर पाणी टाकण्याची मागणी
सवना : सेनगाव तालुक्यातील कनेरगाव नाका - येलदरी पर्यंत रस्त्याचे काम करण्यात येत आहे. या रस्त्याच्या दरम्यान असलेल्या सवना बसस्थानक परिसरामध्ये एक ते दीड किमीचा रस्ता बनविण्यात आला आहे. पण या रस्त्यावर पाणी नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर धुरडा उडत आहे. याचा त्रास वाहनधारकांसह प्रवाशी वर्गांना होत आहे.
अपघाताची शक्यता वाढली
हिंगोली : शहरातील पोलीस कवायत मैदाना समोरील रस्ता, पिपल्स बँके जवळील रस्ता याठिकाणी मोठ्या प्रमाणावर लहान - मोठ्या वाहनांची वर्दळ सुरू असते. अनेक वाहने याठिकाणाहून भरधाव वेगाने धावत असतात. तसेच या दोन्ही ठिकाणी पायी चालणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. अनेकदा रस्ता ओलांडतांना पायी चालणाऱ्यांना वाहनांचा धक्का लागून अपघात झाल्याची घटना या ठिकाणी घडली आहे. यासाठी याठिकाणी वाहतुक शाखेने लक्ष देऊन वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज आहे.