हिंगोली : इंधन, खाद्यतेलापाठोपाठ गॅस सिलिंडरच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे सिलिंडरचे दर हजाराच्या घरात पोहोचले आहेत. वाढत्या किमतीने महिन्याचे बजेट कोलमडले असताना त्यात सिलिंडर पोहोचसाठी जास्तीचे २० रुपये घेतले जात आहेत. ही लूट कधी थांबणार ? असा सवाल गृहिणींमधून उपस्थित केला जात आहे.
कोरोनाकाळात अनेकांच्या हातचा रोजगार गेला असताना महागाई पाठ सोडत नसल्याचे चित्र आहे. इंधन दर वाढीने प्रत्येक वस्तू महाग झाली आहे. खाद्यतेलाच्या किमतीही वर्षभरात दुप्पट झाल्या आहेत. त्यामुळे घरखर्च भागविताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यात गॅस सिलिंडरच्या किमती कमी होण्याचे नाव घेत नाही. मध्यंतरी केवळ दहा रुपये कमी केले होते. मात्र, त्यानंतर दोन वेळेस २५ रुपयांनी गॅस सिलिंडर वाढविण्यात आले. सध्या सिलिंडरची किंमत हजाराच्या घरात पोहोचली आहे. ग्रामीण भागात तर पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याला पसंती दिली जात आहे. शहरातील नागरिकांना दुसरा पर्याय नसल्याने किंमत वाढूनही सिलिंडर खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे महिन्याचे बजेट सांभाळताना नाकीनऊ येत आहेत. अगोदरच गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या असताना त्यात सिलिंडर घरपोहोचसाठी डिलिव्हरी बॉय प्रत्येक सिलिंडरमागे २० रुपये जादा घेत आहेत. सिलिंडर दरवाढीने कंबरडे मोडले असताना त्यात पुन्हा २० रुपयांची वेगळी लूट कशाला असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे.
११ महिन्यांत २९० रुपयांची वाढ
मागील ११ महिन्यांत केवळ एक वेळ १० रुपये कमी करून दिलासा देण्याचा प्रयत्न झाला, तर ४ ते ५ वेळेस गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. यात दोनदा थेट २५ रुपयांनीच वाढ झाली आहे. त्यामुळे नोव्हेंबर २०२० मध्ये ६२० रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर सप्टेंबर २०२१ मध्ये ९१० रुपये ५० पैशांना मोजावा लागत आहे.
डिलिव्हरी बॉयला वेगळे २० रुपये कशासाठी ?
अगोदरच ५०० ते ६०० रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर आता हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यानंतरही डिलिव्हरी बॉयला सिलिंडर पोहोचसाठी वेगळे २० रुपये द्यावे लागतात. ही खरे तर लूटच आहे.
-सविता बांगर, गृहिणी.
गॅस सिलिंडर विकत घेताना सर्व पैसे मोजावे लागतात. आता तर ९०० रुपयांचा आकडा ओलांडला आहे. त्यात डिलिव्हरी बॉय प्रत्येक सिलिंडरमागे २० रुपये जादा घेत आहेत. ही लूट थांबवावी.
-इंद्रायणी घुगे, गृहिणी.
वितरक काय म्हणतात ?
गॅस वितरकांनी पेट्रोलियम मंत्रालय व नैसर्गिक गॅसकडून वेळोवेळी घोषित होणाऱ्या रिटेल प्राईसप्रमाणेच गॅस सिलिंडरची विक्री करणे आवश्यक आहे. घरपोहोच सिलिंडरसाठी कुठलेही वेगळे चार्जेस घेण्यात येत नाहीत. काही डिलिव्हरी बॉय जादा २० रुपये घेत असतील त्याबाबत माहिती नसल्याचे एका वितरकाकडून सांगण्यात आले.
सध्याचा गॅस सिलिंडर - ९१०.५०
शहरातील एकूण ग्राहक ५७०००