फिर्यादी घर झाडत असताना आरोपी विश्वनाथ रूस्तुमराव मुंढे (वय ४२ रा. सालेगाव, ता. कळमनुरी) याने पाणी पिण्याच्या बहाण्याने फिर्यादीची छेड काढल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात २८ ऑगस्ट २०१७ रोजी विश्वनाथ रूस्तुमराव मुंढे याच्याविरुद्ध कलम ३५४,४५२ भा.दं.वि., ३ (१)(डब्ल्यू) अ.जा.ज.अ.प्र.का., ८ बाललैंगिक अत्याचार प्रकरण कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. या प्रकरणास विशेष खटला देण्यात आला होता. हे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.बी. शिंदे यांच्यासमोर चालले. २३ मार्च रोजी न्यायाधीश एन.बी. शिंदे यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून आरोपी विश्वनाथ रूस्तुमराव मुंढे यास कलम ८ बाललैंगिक अत्याचार प्रकरण कायद्यान्वये ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व १० हजारांचा दंड सुनावण्यात आला. तसेच हा दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावास, कलम ४५२ भा.दं.वि. नुसार दोषी ठरवून दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच हा दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी अभियोक्ता सविता एस. देशमुख यांनी बाजू मांडली. त्यांना सहायक सरकारी अभियोक्ता एस.डी. कुटे, एन.एस. मुटकुळे, कोर्ट पैरवी जी.एस. कऱ्हाळे यांनी सहकार्य केले.
बाललैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीस पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:28 IST