हिंगोली : जिल्ह्यात अजूनही तीन हजार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण न केल्याने कर्जमुक्तीचा लाभ मिळाला नाही; तर सहा हजार शेतकऱ्यांना अद्याप विशिष्ट क्रमांकच प्राप्त झाला नसून, या माहितीतील त्रुटी दूर करण्याबद्दल बँकांची उदासीनता शेतकऱ्यांच्या मुळावर उठत आहे.
हिंगोली जिल्ह्यात १.०४ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची अपेक्षा होती. शेवटी बँकांनी १ लाख २ हजार ४२० खातेदारांची माहिती महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर अपलोड केली. त्यामुळे एवढे शेतकरी तरी या योजनेसाठी पात्र असल्याचे समोर आले आहे. यांपैकी ९६ हजार ९६ शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक प्राप्त झाला आहे. आता ज्या शेतकऱ्यांची माहिती योग्य आहे व कर्जमुक्तीसाठी होकार आहे, अशांनी आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे. यापैकी ३ हजार १८८ जणांनी अजूनही प्रमाणीकरण केले नाही. त्यात काहींच्या खात्यातील माहितीत त्रुटी असली तरीही काहींना मात्र याबाबत माहितीच नसल्याने अडचण आहे. बँकांनीही अशांना माहिती दिली नसल्याने ते अजून कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेतच आहेत.
जिल्ह्यातील ९१ हजार ४६६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केल्यानंतर त्यांना ५९४.८७ कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे. म्हणजे हजार शेतकऱ्यांनी प्रमाणीकरण केल्यानंतरही त्यांची रक्कम जमा होणे बाकी आहे. तर आतापर्यंत २२५२ शेतकऱ्यांनी जिल्हा समितीकडे तक्रारी केल्या होत्या. यापैकी १११० तक्रारींचे त्यांनी निवारण केले. तर २० त्यांच्याकडे प्रलंबित आहेत. तर १०८५ तक्रारी तहसील स्तरावरील असल्याने त्यांच्याकडे पाठविण्यात आल्या होत्या. त्यापैकी ३७ प्रलंबित आहेत.
बँकांच्या उदासीनतेत अडकले चार हजार शेतकरी
ज्या १ लाख २ हजार ४२० शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली. त्यापैकी सहा हजार खातेदारांच्या माहितीत त्रुटी आहेत. त्या दूर करण्याची तसदी बँका घेत नसल्याने अजूनही या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला नाही. मागील दोन वर्षांपासून ही योजना सुरू असताना बँकांची ही उदासीनता शेतकऱ्यांच्या मुळावर उठत आहे. शिवाय ज्यांचे आधार प्रमाणीकरण होणे बाकी आहे, अशांच्याही अनेक त्रुटी या बँकांशीच संबंधित आहेत. त्यांनाही या बँका दारात उभे करीत नसल्याने नेमके काय चालले? हे कळायला मार्ग नाही.
किती दिवस चालणार योजना?
शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी शासन तत्काळ निधी देत असले तरीही बँका व प्रशासनाच्या उदासीन धोरणाचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. मागील दोन वर्षांपासून ही योजना सुरू आहे. तरीही सर्व शेतकऱ्यांना अजून लाभ मिळाला नाही. कोरोनामुळे अडचणी येत असल्या तरीही बँकांना या काळात ग्राहकांना सेवा द्यायची नसल्याने ही कामे करण्यास चांगला वाव होता. शिवाय या बँकांमध्येच ही रक्कम जमा होणार आहे. मात्र पुन्हा कर्ज देण्यास टाळाटाळ करण्याची सोयच बंद होणार असल्याने बँका शेतकऱ्यांची कामे करीत नसल्याचे कटू सत्य समोर येत आहे.