वीजपुरवठा खंडित; नागरिक त्रस्त
कळमनुरी : शहरातील आठवडी बाजार, जुना बसस्थानक, गणेशनगर, इंदिरानगर, रेणुकानगर, विकासनगर आदी भागात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. वीज अचानक खंडित होत असल्यामुळे वीज उपकरणे जळून जात आहेत. वेळोवेळी संबंधित विभागाला सांगण्यात आले, परंतु, अद्याप कोणीही लक्ष दिले नाही. महावितरण कंपनीच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.
कळमनुरी तालुक्यात अवैध वाहतूक वाढली
कळमनुरी : तालुक्यातील आखाडा बाळापूर, डोंगरकडा, वारंगाफाटा, बोल्डा, पोत्रा, खरवड, सालेगाव, नांदापूर, सोडेगाव, गौळ बाजार, माळेगाव आदी गावांंमध्ये अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे अपघातही घडत आहेत. दुसरीकडे एस. टी. महामंडळाच्या उत्पन्नात घट होत आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन अवैध वाहतूक बंद करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
लोकसहभागातून बसविली जाणार पुसेगाव येथे बाहुबली भगवंतांची मूर्ती
पुसेगाव : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे लोकसहभागातून बाहुबली भगवंतांची मूर्ती बसविली जाणार असल्याची माहिती मूर्ती निर्माण समितीचे अध्यक्ष कैलास भुरे यांनी दिली.
राष्ट्रसंत आचार्य १०८ विरागसागर महाराजांचे शिष्य प. पू. विशेष सागर महाराज यांच्या सान्निध्यात मूर्तीचे निर्माण कार्य सुरू होणार आहे. हा कार्यक़्रम पुसेगाव येथील जैन सांस्कृतिक भवन प्रांगणात होणार आहे. राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील बिजोरिया येथून हे पाषाण आणण्यात येणार आहे. याचे निर्माणकार्य राजस्थानमधील मकाराणा जिल्ह्यातील कारागीरांच्या हस्ते होणार आहे. मूर्तीची उंची ३१ फूट असणार आहे. यासाठी सकल दिगंबर जैन समाजाच्या सहकार्याने मूर्ती निर्माणकार्य होणार आहे. प्रत्येक ठिकाणी जैन बांधवांकडून पाषाणाची पूजाअर्चा करून भव्य स्वागत होत आहे. काही दिवसांतच हे पाषाण पुसेगाव येथे पोहोचणार असल्याची माहिती भुरे यांनी दिली. खानदेश येथे या मूर्तीचे जागोजागी स्वागत करण्यात आले. मूर्ती निर्माण कार्यासाठी महाराष्ट्रातील संपूर्ण दिगंबर जैन बांधवांचे सहकार्य मिळत आहे. पुसेगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमाचा जैन बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सकल दिगंबर जैन समाज पुसेगावच्यावतीने करण्यात आले आहे.
फोटो नं. ३,४