हिंगोली : जिल्ह्यातील ८ लाख ४३ हजार १८० हजार लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळत आहे. अंत्योदय, बीपीएल आणि एपीएलच्या १ लाख ६३६ लाभधारकांना नगण्य दामात अन्न मिळाल्याने सर्वसामान्यांची तृप्ती होत आहे; परंतु गहू आणि तांदळाचा ४ हजार ४८९ मेट्रीक अतिरिक्त धान्य लागत आहे. देभरात बहुतांश लोकांना एकवेळेचे जेवण मिळत नाही. भूकबळीची संख्याही लक्षणीय आहे. आधीच रेशनकार्डधारकांसाठी दोन ते तीन योजना राबविल्या जात होत्या. तरीही शासनाने उपाशीपोटी झोपणाऱ्या नागरिकांचा विचार करीत ‘राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना’ सुरू केली. प्रामुख्याने त्यात रेशनकार्डधारकांना २ रूपये किलोने गहू, ३ आणि १ रूपये किलोप्रमाणे तांदूळ आणि ज्वारीचा लाभ मिळतो. जिल्ह्यात त्यानुसार १ लाख ६ हजार ३६ रेशनकार्डांची नोंद सापडते. त्यावर ८ लाख ४३ हजार १८० लाभार्थ्यांची संख्या आहे. बीपीएल व एपीएल मिळून १ लाख ४१ हजार २७ कार्ड आहेत. दुसरीकडे अंत्योदय योजनेचे २७ हजार ३०९ कार्डधारक आहेत. प्रतिकार्डधारकांना महिन्याकाठी ५० किलोचे धान्य मिळते. त्यात २७ किलो गहू, १० किलो तांदूळ आणि १५ किलो ज्वारीचा समावेश आहे. मात्र पुरवठा विभागाकडे कधी धान्य नसते तर कधी रेशन दुकानदाराकडून धान्य वितरण केल्या जात नाही. परिणामी, लाभधारकांना अनेकवेळा धान्याची वाट पाहवी लागते. शिवाय काळ्या बाजारात जाणाऱ्या धान्यांची संख्याही कमी नाही. परंतु या योजनेचा लाभ अगदी सर्वसामान्यांना झाला आहे. शहरी भागात ५९ हजार तर ग्रामीण भागात ४४ हजार उत्पन्न असणाऱ्यांना याचा लाभ मिळत आहे. बहुतांश जणांची भूक भागली आहे. (प्रतिनिधी)
८ लाख लोकांना अन्न
By admin | Updated: October 7, 2014 00:13 IST