लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात सन २०१९मध्ये ४२७, तर २०२० मध्ये २७७ जणांना सापाने दंश केला. साप चावलेल्यांनी वेळीच उपचार करुन घेतल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. दुसरीकडे दोघांना मात्र प्राणास मुकावे लागले.
साप चावण्या्च्या घटना जास्त करुन शहरी भाग वगळता ग्रामीण भागात घडतात. आजही अनेक जण सापाने दंश केला की, गंडेदोरे करतात किंवा गावातील मांत्रिकांना दाखवितात. अघोरी कृत्य करण्यावर अनेकांचा भर पाहायला मिळतो.
ज्याला साप चावला, त्या रुग्णाने लगेच डाॅक्टरांशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील २४ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह ५ ग्रामीण रुग्णालयात आणि हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘अँटिस्नेक व्हीनम’ ही लस उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
सापाने दंश केल्याबरोबर थोडाही उशीर करु नये. नातेवाईकांनी संबंधित रुग्णास ताबडतोब नजीकचे जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
अघोरी कृत्यापासून दूर राहावे
साप चावल्याबरोबर कोणताही घरगुती उपचार करू नये. साप चावल्याचे सांगून कोणत्याही मांत्रिकाकडून उपचार करुन घेऊ नयेत. बहुतांश लोक साप चावल्याबरोबर मांत्रिकाकडून उपचार करुन घेतात. बरेच जण ज्या ठिकाणी साप चावला आहे, त्या ठिकाणी पत्तीने कापतात आणि विविध पाल्यांचा रस टाकतात. असा काही अघोरी प्रकार न करता नजीकच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.
जिल्ह्यात सापाच्या १५ जाती
महाराष्ट्रात सापाच्या ५२, तर हिंगोली जिल्ह्यात १५ जाती आहेत. विषारी सापामध्ये मनियार, कुर्से, आग्यापरेड, कोब्रा (नाग), तर बिनविषारी सापामध्ये दीवड, धूळ नागीन, धामीण, कवड्या ढोरक्या घोणस, महांडूळ, कुकरी, एकरी, पसकर यांचा समावेश आहे. निमविषारी सापांमध्ये मांजऱ्या, हरणटोळ हे साप आहेत, अशी माहिती सर्पमित्र मुरली कल्याणकर, ओम जाधव यांनी दिली.