हिंगोली : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने मागील वर्षभरात ३०३ जणांवर कारवाई करीत त्यांच्याकडून ७ लाख ९३ हजार ४०३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच १० लाख रुपये किमतीची १३ वाहनेही ताब्यात घेण्यात आली आहेत. जिल्हाभरात हातभट्टी, अवैध देशी, विदेशी दारू विक्री करणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने कारवाई केली जाते. या विभागाच्या वतीने मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१ या काळात ३०३ जणांवर कारवाई करण्यात आली असून यामध्ये २६९ वारस तर १३४ बेवारस गुन्ह्यांचा समावेश आहे. यातील १६९ आरोपींना अटक करण्यात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने देण्यात आली. दरम्यान, जिल्हाभरात हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये या पथकाने ३१३ लिटर दारू जप्त केली असून १ हजार ७९४ लिटर रसायन नष्ट केले आहे. तसेच १४७ लिटर देशी तर ८४ लिटर विदेशी दारूही जप्त करण्यात आली. शिवाय २६ लिटर बीअर ताब्यात घेतली असून १० लाख १० हजार रुपये किमतीचे १३ वाहनेही जप्त करण्यात आली. मागील वर्षभरात जवळपास ७ लाख ९३ हजार ४०९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने देण्यात आली.
३७ लाख लिटर देशी दारू फस्त
जिल्हाभरात देशी दारूची दुकाने, बार, बीअर शॉपी आदींच्या माध्यमातून दारू विक्री करण्यास परवानगी दिली जाते, जिल्ह्यात ४२ देशी दारू विक्रीची दुकाने असून १०३ बार, ५१ बीअर शॉपी आहेत. या काळात जिल्हाभरात ३७ लाख लिटर देशी दारू विक्री झाली आहे. तसेच ७ लाख ८० हजार विदेशी दारू, ५ लाख ५७ हजार लिटर बीअर विक्री झाल्याची माहिती या विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.