हिंगोली : राज्य सरकारच्या नवीन घोषणेनुसार जिल्ह्यातील फेरीवाल्यांना १ हजार ५०० रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे, परंतु ही मदत खूपच तुटपुंजी असल्याची प्रतिक्रिया फेरीवाल्यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने फळ, भाजीपाला व इतर फेरीवाल्यांना मालाची विक्री करणे शक्य होत नाही. कोरोना महामारीमुळे ओढावलेले संकट पाहून राज्य शासनाने नोंदणीकृत फेरीवाल्यांना १ हजार ५०० रुपये देण्याची घोषणा केली आहे. जिल्ह्यात नोंदणीकृत फेरीवाले १ हजार ७३१ आहेत. यामध्ये हिंगोली ६८१, वसमत ६००, कळमनुरी २५०, सेनगाव १००, औंढा नागनाथ १०० अशी फेरीवाल्यांची नोंद केली आहे.
गत दोन वर्षांपासून फेरीवाल्यांवर मोठे संकट ओढावले आहे. कोरोनाचे रुग्ण सतत वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाला संचारबंदी करावी लागत आहे. परिणामी, फेरीवाल्यांना आर्थिक फटका बसत आहे. ज्या फेरीवाल्यांनी नगर परिषदेकडे नोंद केली आहे, अशांनाच शासनाने जाहीर केलेली मदत मिळणार आहे. परंतु, अजून तरी मदत नगर परिषदेपर्यंत पोहोचली नाही. शासनाच्या नियमाप्रमाणे मदत वाटप केली जाईल, अशी माहिती स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांनी दिली.
फोटो नंबर २६