डॉक्टरांनीच केला आरोग्याचा पंचनामा महापालिका बैठक : औषध खरेदीचे आदेश
By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST
सोलापूर : दवाखान्यात सोनोग्राफी, एक्सरे मशीन बंद, सलाईन नाही की खोकल्याचे औषध नाही. बाळाला पाळणे नाहीत ना बेड धड नाहीत. प्रसुतीसाठी टेबल नाही तर घाण झालेले बेडशीट धुवायला पाणी नाही. इजेंक्शन द्यायचे म्हटले तर सुई नाही. सांगा अशा अवस्थेत आम्ही दवाखाना कसा सांभाळायचा. या स्थितीमुळे रुग्ण आमच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत, अशी व्यथा महापालिकेच्या दवाखान्यातील डॉक्टरांनी मांडल्यामुळे पदाधिकारी चकीत झाले.
डॉक्टरांनीच केला आरोग्याचा पंचनामा महापालिका बैठक : औषध खरेदीचे आदेश
सोलापूर : दवाखान्यात सोनोग्राफी, एक्सरे मशीन बंद, सलाईन नाही की खोकल्याचे औषध नाही. बाळाला पाळणे नाहीत ना बेड धड नाहीत. प्रसुतीसाठी टेबल नाही तर घाण झालेले बेडशीट धुवायला पाणी नाही. इजेंक्शन द्यायचे म्हटले तर सुई नाही. सांगा अशा अवस्थेत आम्ही दवाखाना कसा सांभाळायचा. या स्थितीमुळे रुग्ण आमच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत, अशी व्यथा महापालिकेच्या दवाखान्यातील डॉक्टरांनी मांडल्यामुळे पदाधिकारी चकीत झाले. स्थायी समितीचे सभापती बाबा मिस्त्री यांनी महापालिकेच्या दवाखान्यातील सुविधेबाबत शुक्रवारी आरोग्य विभागाची बैठक घेतली. बैठकीला सभागृहनेते संजय हेमगड्डी, अपर आयुक्त विलास ढगे, उपआयुक्त श्रीकांत मायकलवार, अमिता दगडे- पाटील आणि सर्व दवाखान्यांचे डॉक्टर उपस्थित होते. बैठकीच्या सुरूवातीलाच सभापती मिस्त्री यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाबाबत लोकांच्या तक्रारी आहेत, सेवेत सुधारणा होणार की नाही, असा सवाल उपस्थित केला. दवाखान्यातील व्यवस्थेबाबत डॉक्टरांनी अडचणी मांडाव्यात, अशी सूचना हेमगड्डी व ढगे यांनी केली. त्यावर डॉ. बासुतकर, डॉ. मिनल खंदारे, डॉ. अरूंधती हराळकर यांनी दवाखान्याच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकला. पावसाळा व हिवाळा गेला तरी औषधेच पुरविली गेली नाहीत. दवाखान्यात भूल व मुलांचे तज्ज्ञ नाहीत. खोकल्याचे औषध नाही. औषधांचा दर्जा सुमार असतो. प्रसुतीसाठी ॲम्ब्युलन्स मिळत नाही. अनेक पदे रिक्त आहेत. शिपाई, वॉचमन, तंत्रज्ञ नाहीत. दवाखान्यातच अस्वच्छता असते. मेडिकल कचरा वेळेवर उचलला जात नाही. या सगळ्या समस्या पाहता, एकच हॉस्पिटल सुसज्ज करा, आम्ही सेवा द्यायला तयार आहोत अशी मागणी डॉक्टरांनी केली. सहायक आयुक्त दगडे-पाटील यांनी केंद्र शासनाची शहरी आरोग्य योजनेत डफरीन व बॉईज हॉस्पिटलचा प्रस्ताव असल्याचे सांगितले. त्यावर अपर आयुक्त ढगे यांनी सर्व दवाखान्यांना तातडीने गरजेची औषधे थेट पुरविली जातील. डॉक्टरांनी रुग्णांमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी मन लावून काम करावे. ज्या गरजा आहेत, त्याची मागणी तातडीने करावी. रिक्त पदे भरली जातील व कंत्राटी डॉक्टरांना शहरी आरोग्य योजनेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव दिला जाईल असे सांगितले. कोट..महापालिकेच्या दवाखान्यात अशा गैरसोयी असतील तर नागरिकांच्या आरोग्याचे काय, हा गंभीर प्रश्न आहे. आयुक्त गुडेवार पाणी व इतर गोष्टींसाठी ६३/३ अधिकाराचा वापर करतात. मग नागरिकांचे आरोग्य हा चिंतेचा विषय नाही का?बाबा मिस्त्रीसभापती, स्थायी