१५... रामटेक
By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST
(फोटो)
१५... रामटेक
(फोटो)वसतिगृहातील विद्यार्थिनींना गॅस्ट्रोची लागणरामटेक येथील प्रकार : रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यतारामटेक : स्थानिक सुभाष वॉर्डातील आदिवासी मुलींच्या वसतिगृहात वास्तव्याला असणाऱ्या तीन विद्यार्थिनींना गॅस्ट्रोची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. या तिन्ही विद्यार्थिनींना रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. रेशमा कोडवते (१७), सोनम कुमरे (१९) आणि अंजली उईके (१८) अशी गॅस्ट्रोची लागण झालेल्या विद्यार्थिनींची नावे आहेत. या तिन्ही विद्यार्थिनी रामटेक येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहात राहतात. सदर वसतिगृह राज्य शासनाच्या आदिवासी विभागातर्फे चालविण्यात येते. येथे इयत्ता आठवी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थिनी राहतात. या तिघींव्यतिरिक्त या वसतिगृहातील अन्य पाच विद्यार्थिनींनाही अशाच प्रकारे त्रास झाल्याची माहिती जाणकारांनी दिली. त्यामुळे गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला स्थानिक उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. सदर प्रकाराची माहिती मिळताच पंचायत समिती सभापती किरण धुर्वे, पंचायत समिती सदस्य कल्पना गोंगले व छाया वंजारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सोबत घेऊन रुग्णांची चौकशी केली आणि वसतिगृहाला भेट दिली. शिवाय हा आजार पाण्यामुळे होत असल्याने वसतिगृहातील पिण्याच्या पाण्याच्या बोअरवेलमधील पाण्याचे नमुने तपासण्याचे आदेश दिले. दरम्यान, या आदिवासी मुलींच्या वसतिगृहात सभापती धुर्वे यांना अनेक समस्या आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणी सर्वत्र अन्नाची शिते विखुरलेली होती. वसतिगृहाला केवळ एकच दार आहे. इतर नऊ खोल्यांना दारे नसून, केवळ पडद्यांचा वापर करण्यात येतो. येथील कर्मचारीदेखील उपस्थित नसल्याचे त्यांना भेटीदरम्यान आढळून आले. पूर्वीच्या गृहपाल नवघरे यांच्या जागी लिपिक असलेल्या भोगे नावाच्या महिला कर्मचारी गृहपाल म्हणून काम पाहात असल्याचे आढळून आले. दुसरा भिवगडे नावाचा कर्मचारी सुरक्षा रक्षक असून, तोही भेटीच्या वेळी हजर नव्हता. या वसतिगृहातील एक मुलगी तापाने फणफणत असल्याचे धुर्वे यांना आढळून आले. तिच्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते. बाहेरून गोळ्या आणून तिला मैत्रिणींनी दिल्याचे सांगण्यात आले. येथील मुलींच्या आरोग्याची नियमित तपासणी केली जात नसल्याची तक्रार विद्यार्थिनींनी धुर्वे यांच्याकडे केली. या ठिकाणी साधी प्रथमोपचाराची कुठलीही साधने नसल्याचे आढळून आले.