गोंदिया : शिरपूर येथील सीमा तपासणी नाकावरून ट्रक पास करण्यासाठी २०० रुपयांची मागणी करणाऱ्या एका इसमास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. शुक्रवारी (दि.३९) शिरपूर सीमा तपासणी नाका येथे ही कारवाई करण्यात आली आहे. अब्दुल सलीम अब्दुल हबीब शेख (३७, रा. नागपूर) असे पकडण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.
सविस्तर असे की, तक्रारदार हे ट्रक चालक असून अकोला ते रायपूर तांदूळ भरून नियमित जात असतात. अशात शिरपूर येथील सीमा तपासणी नाका येथे परिवहन अधिकारी व कर्मचारी गाडी पास करण्यासाठी ३०० ते ५०० रुपयांची मागणी करतात, अशी तक्रार त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे शुक्रवारी (दि.२९) नोंदविली. प्रकरणी एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता शिरपूर सीमा तपासणी नाका येथे हजर अब्दुल शेख याने तक्रारदाराकडे ३०० रुपयांची पंचांसमक्ष मागणी करून तडजोडीअंती २०० रुपये प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. प्रकरणी अब्दुल शेख विरोधात दजेवरी पोलीस ठाण्यात ७(ए) लाप्रका १९८८ (सुधारित अधिनियम २०१८) अंतर्गत गु्न्हा नोंद करण्यात आला आहे.