गोंदिया : नकली दारूमुळे होणारी बाधा, सोबत दारूच्या वाढलेल्या किमती, ग्रामीण भागातील युवकांना परवडत नाही. याला पर्याय त्यांनी शाेधून काढला आहे. आता नशा आणणाऱ्या औषधी आणि टॅबलेटचा वापर युवा वर्ग नशेसाठी करीत आहे. ग्रामीण भागात सध्या गोळ्यांनी नशा करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. व्यसनी लोकांची पहिली पसंती मुन्नका आहे. यासोबत बऱ्याच औषधांचा उपयोग नशेसाठी केला जात आहे.
ग्रामीण भागात अशा प्रकारची नशाखोरी वाढत आहे. युवा पिढी त्यांच्या गावात मिळणारी हातभट्टीची दारू पिणे पसंत करीत नाहीत. विदेशी दारू महाग असते तेवढा पैसा त्यांच्याजवळ नसतो. अशात मग व्यसन, नशा करायची तर कशी कारायची हा प्रश्न उपस्थित होतो. याचा उपाय व्यसनी तरुणांनी अशा गोळ्यांच्या स्वरूपात शोधला आहे. अशा गोळ्यांचा शरीरावर काय परिणाम होईल याची चिंता न करता बेधडकपणे अशा गोळ्यांचा वापर होत आहे. नशेसाठी मेडिकल स्टोअर्समध्ये मिळणाऱ्या दुखणे नाशक औषधी आणि कफ सिरपचाही उपयोग केला जात आहे. काही वर्षांपूर्वी अन्न व औषधी प्रशासन विभागाने नार्कोटिक्स ड्रग्सअंतर्गत येणाऱ्या औषधांच्या विक्रीवर कडक नियम लागू केले होते. यामुळे खरेदीदारांसोबत विक्रेतेही अडचणीत आले होते. नंतर ते नियम शिथिल करण्यात आले. मात्र त्याचा लाभ गरजवंताऐवजी व्यसनी लोक उचलत आहेत. एक वेळा नशेच्या ५ ते दहा गोळ्यांचे सेवन केले तर त्यांची नशा चार ते पाच तास राहात असल्याचे शौकिनांनी सांगितले. कमी पैशात नशेचा शौक पूर्ण होणे आणि मुखातून दारूसारखा वास येत नसल्याने व्यसनी लोकांचे याकडे आकर्षण वाढत आहे. ज्या रुग्णांना अशा गोळ्यांची गरज असते त्यांना मेडिकल स्टोअर्समधून गोळ्या मिळत नाहीत, मात्र नशेखोरांना त्या गोळ्या मुबलक प्रमाणात मिळतात. याची चौकशी होण्याची गरज आहे.
बॉक्स
दारूबंदीमुळेही तरुणांचा कल गोळ्यांकडे
कोरोनाचा संसर्ग झाल्याने सर्वच प्रकारची दारू, विदेशी दारूची दुकाने बंद आहेत. या दारूबंदीमुळे आपली शौक कशी भागवायची याची शक्कल तरुणांनी शोधून काढले आहे. दारू दुकाने बंद आणि मेडिकल सुरू ठेवल्याने तरुणांचा कल आता गोळ्यांकडे वाढला आहे.