लोहारा (तिरखेडी) येथील घटना : संबंध ठेवणाऱ्यांना १० हजारांचा दंडसाखरीटोला : शारदा उत्सवादरम्यान वीज बंद करते या कारणातून सहेसराम धाडू येरणे (४२) यांच्या कुटुंबावर गावातील प्रमुख व्यक्ती व गावकऱ्यांनी बहिष्कार टाकल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. येथून १० किलोमीटर अंतरावरील लोहारा (तिरखेडी) येथील ही घटना असून मागील आठ दिवसांपासून सहेसरामचे कुटुंब बहिष्कृत जीवन जगत आहे. सविस्तर असे की, नवरात्रोत्सवांतर्गत लोहारा येथे एक दुर्गा व दोन शारदांची स्थापना करण्यात आली होती. यादरम्यान बरेचदा वीज पुरवठा खंडीत होत होता. हा वीज पुरवठा सहेसराम हेच बंद करीत असल्याचा आरोप करण्यात आला. यासाठी २३ आॅक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता लक्ष्मीचंद पटले, मुन्ना रहांगडाले, महागू मेश्राम यांनी सहेसरामच्या घरी जाऊन गावात सभा ठेवली असल्याचे सांगितले. त्यांना नागपूरला जायचे असल्याने त्यांनी २५ तारखेला सभा घेण्याचे सुचविले व ते निघून गेले. मात्र गावकऱ्यांनी सभा घेतली व सहेसरामला दोषी ठरवून शिक्षा सुनावली. २५ आॅक्टोबर रोजी नागपूरवरून परत आल्यावर सायंकाळी सहेसराम यांना ही बाब कळली. त्यामुळे त्यांनी २६ तारखेला सभा घेण्यासाठी हिवराज चंद्रिकापुरे यांना सांगीतले. त्यानुसार रात्री ग्रामपंचायत कार्यालयात सभा ठेवली. सभेत सरपंच राधेलाल डामा रहांगडाले, पोलीस पाटील सुरेश चौधरी, तंमुस अध्यक्ष योगेश कटरे, लक्ष्मीचंद पटले, मुन्ना रहांगडाले, महागू मेश्राम, भाऊलाल रहांगडाले, जीवनलाल हरिणखेडे, माजी तंमुस अध्यक्ष तसेच इतर गावकरी हजर होते. यावेळी सहेसरामने सभा कशाकरिता ठेवली आहे असा प्रश्न केला. तेव्हा सरपंच रहांगडाले यांनी गावात वीज पुरवठा बंद करतो असा आरोप केला. तेव्हा सहेसरामने आरोप नाकारून १४ आॅक्टोबरला रात्री ७.३० ते ८ वाजतादरम्यान शामलाल मडावी सोबत गोरेगावला गेलो होतो त्यामुळे वीज पुरवठा बंद करण्याचा प्रश्नच नाही असे सांगीतले. तेव्हा सरपंच, पोलीस पाटील व तंमुस अध्यक्षांनी सहेसरामला गुन्हा कबूल करण्यास बजावले. तसेच जर गुन्हा कबूल नसेल तर ४५ हजार रूपये दंड भर नाही तर गावातून हद्दपार हो, अशी शिक्षा दिली. गावातील लोकांनी सहेसराम व त्यांच्या कुटुंबासोबत कोणतेही संबंध ठेवू नये, असे फर्मान सुनावले. तसेच जर कुणी त्यांच्या संबंध ठेवला तर अशा व्यक्तीला १० हजार रूपये दंड सुनावत संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीचे नाव सांगणाऱ्यास तीन हजार रूपयांचे बक्षीस घोषित केले. या शिक्षेमुळे मागील आठ दिवसांपासून सहेसरामचे कुटुंब बहिष्कृत जीवन जगत आहे. या घटनेचा त्यांच्या कुटुंबावर विपरीत परिणाम झालेला असून ते दहशतीत आहेत. सहेसराम यांचा मुलगा शाळेत असून त्यालाही गावकरी टोचून बोलणे व धमकावीत असल्याचा आरोप सहेसराम यांनी केला आहे. या घटनेसाठी तंमुस अध्यक्ष जबाबदार असल्याचा आरोर सहेसराम यांनी केले असून सदर घटनेची तक्रार त्यांनी सालेकसा पोलीस स्टेशनला ३१ आॅक्टोबर रोजी दिली आहे. वृत्त लिहेपर्यंत प्रकरण थंडबस्त्यात आहे. प्रकरणी प्रतिनिधीने पोलीस पाटील सुरेश चौधरी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी बहिष्कार केल्याचे मान्य केले असून गावकऱ्यांचा निर्णय असल्याचे सांगितले तर सरपंच राधेलाल रहांगडाले यांनी भ्रमणध्वनीवर घटनेला दुजोरा दिला. (वार्ताहर)
येरणे कुटुंबावर टाकला बहिष्कार
By admin | Updated: November 2, 2015 01:23 IST