नवेगावबांध : विज वितरण कंपनीच्या नवेगावबांध उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या सुमारे ४७ गावाच्या कामकाजाच्या डोलारा अवघ्या सहा कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांची दमछाक होते. हे काम करताना त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. नवेगावबांध उपकेंद्रांतर्गत विविध फिडरच्या माध्यमातून परिसरातील ४७ गावांंना विज पुरवठा केला जातो. दैनंदिन काम, देखभाल दुरूस्ती, नविन जोडणी लावणे, तक्रारीचे निवारण करणे, थकीत देयके वसूल करणे इत्यादी कामे कंपनी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या भरवश्यावरच करून घेते. परंतु नवेगावबांध उपकेंद्रात एकूण १२ कर्मचाऱ्यांऐवजी ६ कर्मचारी नियुक्त आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण पूर्णपणे होत नाही. यामुळे नियुक्त कर्मचाऱ्यांची दमछाक होते तरीही ग्राहकांना देखील समाधान मिळत नाही. विज वितरण कंपनी मात्र आपले कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च होणारे पैसे वाचवित आहे. आता उन्हाळा सुरू झाला. त्यामुळे आता विजेची सर्वांनाच गरज आहे. उद्योगपती, शेतकरी, व्यावसायीक, शासकीय कार्यालये, लग्न समारंभ आदी ठिकाणी विजपुरवठा सुरळीत सुरू असणे आवश्यक आहे. विज वितरण कंपनीने पुरेसा कर्मचारी वर्ग नियुक्त करून ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला तर वेळेवर पूरवठा करण्यात येत नाही. त्यात विद्युत ग्राहकांच्या अनेक समस्या असतात. त्या संदर्भात तक्रार केली तरी त्याकडे लक्ष द्यायला कुणी नाही. (वार्ताहर)
सहा कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर ४७ गावांची धुरा
By admin | Updated: March 27, 2017 00:56 IST