अर्जुनी/मोरगाव : प्रत्येक गावात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांसोबत ग्रामवासीयांची ही भूमिका महत्वाची आहे. पोलीस आणि गावकरी एकमेकांचे दुवे आहेत. गावात चालणारे अवैध व्यवसाय व अनुचीत प्रकार याला आळा घालण्यासाठी व प्रत्येक घरात शांतता कायम राहण्यासाठी आता महिलांनीही पुढाकार घ्यावा व पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भागवत यांनी केले.समोर धार्मिक उत्सव व विधानसभा निवडणुक शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून पोलीस पाटील सभागृहात २१ सप्टेंबर रोजी तालुक्यातील महिला पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्त समिती महिला सदस्य, ग्रा.पं. सदस्य व महिला बचतगटांतील सदस्यांच्या मेळाव्यात पोलीस निरीक्षक संदीप भागवत बोलत होते. महिलांना मार्गदर्शन करताना ठाणेदार भागवत म्हणाले की, आज प्रत्येक गावात व घराघरात व्यसनाधिनता वाढत आहे. वाईट व्यसनामुळे घरातील आर्थिक बाजू कमजोर होवून घरातील सामंजस्य कमजोर होत चालले आहे. व्यसनामुळे महिलांवर अन्याय अत्याचार कौटुंबिक हिंसाचार कारणीभूत आहेत. त्यामुळे समाजिक सलोखासुद्धा दूरावत आहे. यासाठी महिलांनी आता आपल्या घरापासूनच व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी पुढे आले पाहिजे. पोलिसांकडे असलेला अपूरा मनुष्यबळ ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे सामाजिक दायीत्व स्विकारुन अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी महिलांना संघटीतकरुन पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन संदीप भागवत यांनी केले. गावातील महिलांनी पोलिसांचे डोळे, नाक, कान बनावे गावात काही अवैध धंदे व अजुचीत प्रकार आढळल्यास सरळ ठाणेदार किंवा पोलीस स्टेशनला कळवावे म्हणाले. येणाऱ्या काळात शांततेची सुरवात स्वत:च्या घरापासूनच करण्याचे आवाहन सुद्धा यावेळी ठाणेदार संदीप भागवत यांनी केले. पोलीस हे सुद्धा माणसंच आहेत. त्यांनाही ह्रदय आहे व सामाजिक दायीत्वाची जाणीव आहे. मात्र अनेक प्रकरणाचा तपास करताना जनतेचे सहकार्य मिळत नसल्याने तपासामध्ये बाधा निर्माण होते. अशावेळी पोलीस व जनता यांच्या मध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. जनतेच्या सहकार्याशिवाय तपास पुर्ण होऊ शकत नाही. समाजाचे हित व शांतता प्रस्थापीत करण्यासाठी व पुढे येणारे धार्मिक उत्सव व विधानसभा निवडणुका लक्षात घेवून यापुर्वी गावातील ग्राम सुरक्षा दल,पोलीस पाटील तंटामुक गाव समिती अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आपल्या काळात पोलीस मित्र म्हणून काम करण्यासाठी गावातील तरुणांनी पुढे येण्याचे आवाहन भागवत यांनी करुन पोलीस मित्र म्हणून काम करण्यासाठी जे तरुण समोर येतील त्यासाठी आपण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन परवानगी घेण्यात येईल.सामाजिक भावना लक्षात घेवून रक्तदान शिबिर, मर्दानी खेळाचे सामने आयोजित करुन शांतता समितीची बैठक, मेळावे घेवून भागवत यांनी गुन्हेगारीवर वचक मिळव असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
‘शांतता कायम ठेवण्यासाठी महिलांनीही पुढाकार घ्यावा’
By admin | Updated: September 24, 2014 23:37 IST