साखरीटोला : मंडळ अधिकारी पद मंजूर असतांना व प्रभार असूनही मंडळ अधिकाऱ्यांसाठी येथे कार्यालयचं नाही. अशात त्यांनी बसावे कोठे असा प्रश्न उभा झाला आहे. मात्र याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याचे चित्र पहावयास मिळते. सालेकसा तालुक्यातील साखरीटोला (सातगाव) हे गाव महत्वाचे आहे. विविध शासकीय कार्यालय सातगावच्या नावाने मंजूर आहेत. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने अजूनही बऱ्याच सोयी सुविधांचा अभाव आहे. यातच महसूल विभाग अत्यंत महत्वाचे विभाग असताना सामान्य लोकांना या विभागाशी विविध कामांसाठी संपर्क करावा लागतो. असे असतांना सुध्दा सुविधांच्या अभावाने नागरिकांच्या कार्यात दिरंगाई होते. सन २०११ पासून येथे मंडळ अधिकारी कार्यालय मंजूर झाले आहे. मात्र आजपर्यंत स्वतंत्र कार्यालय सुरु करण्यात आलेले नाही. कार्यालय मंजूर होताच बसण्याची स्वतंत्र व्यवस्था, दस्तावेज ठेवण्यासाठी आलमारी आदी वस्तुंची गरज असते. मात्र आजतागायत सदर व्यवस्था करण्यात आलेली नाही. ग्रामपंचायत सचिवालयात एका छोट्या खोलीत तलाठी कार्यालय आहे. त्यातच मंडळ अधिकाऱ्यांना कसेबसे कामकाज करण्याची पाळी आली आहे. अनेकदा या प्रकाराबाबत वरिष्ठांना कळविण्यात आले. मात्र कारवाई थंडबस्त्यात आहे. मंडळ अधिकारी कार्यालय मंजूर करताच सदर कार्यालयासाठी लागणारे साहित्य सोबत देणे गरजेचे असतांना केवळ कार्यालय मंजूर केले. मात्र साहित्य व कार्यालयच मिळाले नसल्याने येथील मंडळ अधिकारी वाऱ्यावर कारभार करणार काय? असा प्रश्न जनता विचारत आहे. मंडळ अधिकारी कार्यालय नसल्याने जनतेची कामे रेंगाळली आहेत. याकडे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी लक्ष घालतील अशी आशा गावकऱ्यांची आहे. तसेच तहसील कार्यालय सुध्दा मंजूर असतांना मात्र नायब तहसीलदार सुध्दा कार्यालयाविना आठवड्यातून एकही दिवस फिरकत नाही हे विशेष. (वार्ताहर)
मंडळ अधिकारी कार्यालयाविना
By admin | Updated: February 12, 2015 01:16 IST