गोंदिया : नगरसेविका रत्नमाला साहू यांचे पती ऋषिकांत साहू यांनी नगर परिषद अभियंता डॉली मदान यांना धमकावणी व त्यांच्या दालनातील खुर्च्यांची फेकाफेकी केल्याने नगर परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांत चांगलाच रोष व्याप्त होता. यालाच घेऊन मंगळवारी (दि. २) कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मंगळवारी मुख्याधिकारी करण चव्हाण व नगराध्यक्ष अशोक इंगळे यांना निवेदन देण्यात आले. यात, मुख्याधिकारी चव्हाण यांनी समजूत घातल्यानंतर कर्मचाऱ्यांनी कामकाज सुरळीतपणे सुरू केले.
शहरातील रेलटोली परिसरातील रस्त्यावर पेविंग ब्लाॅक लावण्यासाठी कंत्राटदाराला कार्यादेश द्या अथवा काम करण्यास सांगा यावरून ऋषिकांत साहू यांनी नगर परिषद अभियंता डॉली मदान यांना सोमवारी (दि.१) धमकी दिली होती. एवढेच नव्हे तर त्यांच्या दालनातील खुर्च्यांची फेकाफेक केली होती. या प्रकरणी मदान यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. मात्र नगर परिषद अधिकारी-कर्मचारी चांगलेच नाराज असून त्यांनी या प्रकरणाचा निषेध नोंदवून मंगळवारी (दि.२) कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार, मंगळवारी नगर परिषदेतील सर्व अधिकारी-कर्मचारी एकत्र आले व त्यांनी घडलेल्या प्रकाराला घेऊन मुख्याधिकारी चव्हाण तसेच नगराध्यक्ष इंगळे यांना प्रकरणी कारवाई करावी तसेच कामबंद आंदोलन करण्याबाबत निवेदन दिले. यात नगराध्यक्ष इंगळे यांनी, हा प्रकार उचित नसल्याचे सांगत अधिकारी-कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तर मुख्याधिकारी चव्हाण यांनी कामबंद आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे अडतात, त्यामुळे कामबंद आंदोलन न करण्याबाबत समजूत काढली. यानंतर कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन मागे घेतले.
--------------------------------
अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये संताप
साहू यांनी नगर परिषद अभियंता मदान यांच्यासोबत केलेल्या व्यवहारानंतर नगर परिषदेत कार्यरत अधिकारी-कर्मचारी चांगलेच संतापले आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वीही नगर परिषदेत कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांशी पदाधिकारी व सदस्यांकडून असाच व्यवहार करण्यात आल्याचे प्रकार घडले आहे. मात्र नेहमीच काहीच कारवाई होत नसून नगर परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबत असे प्रकार घडतच आहेत. मात्र यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.