गोंदिया : गोंदिया जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक येत्या ३० जून रोजी होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी गुरुवारी याबाबतची घोषणा केली. या निवडणुकांसाठी रात्री १२ वाजतापासून आचारसंहिता लागू होत आहे. गेल्या महिनाभरापासून याबाबत निर्माण झालेली उत्सुकता आता संपुष्टात आली आहे. सर्व राजकीय पक्षांसह उमेदवारांना निवडणुकीसाठी अवघे २५ दिवस मिळणार आहेत.१० ते १५ जून या कालावधीत नामनिर्देशनपत्रे इच्छुकांना देवून स्वीकारले जातील. १६ जूनला अर्जांची छाननी होवून वैध उमेदवारांची यादी प्रकाशित केली जाईल. त्याबाबत कोणाला आक्षेप असल्यास जिल्हा न्यायाधीशांकडे १९ जून पर्यंत अपिल करता येईल. अपिल नसलेल्या ठिकाणी २२ जूनपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणुक रिंगणात असणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. अपिल असलेल्या ठिकाणी २४ जूनपर्यंत नामनिर्देशपत्रे मागे घेता येतील. मतदान केंद्रांची यादी २४ जूनला प्रसिद्ध केली जाणार आहे. ३० जूनला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. १० जुलै रोजी सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. निवडणूक निकाल जाहिर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल असे निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले. (जिल्हा प्रतिनिधी)
३० जूनला होणार जि.प.-पं.स. निवडणूक
By admin | Updated: June 5, 2015 01:54 IST