आमगाव : येथील नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या वाॅर्डात कोरोनाच्या संकटकाळात धावून जाणारे वॉर्ड मेंबर नसल्याने नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ‘कोरोनाच्या कालावधीत वाॅर्डाचा वाली कोण?’ असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात वाॅर्ड मेंबर आपापल्या प्रभागात नागरिकांसाठी आरोग्य तसेच इतर व्यवस्था हाताळताना दिसून येतात; पण ताण्याबापूची आमगाव नगरी याला अपवाद आहे. या नगर परिषदेचे भविष्य न्यायालयीन प्रकरणात अडकले आहे. परिणामी नगर परिषदेची निवडणूक झाली नाही. मेंबर नसल्याने या वाॅर्डाचा वाली कोण? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रुग्णालय असो या तेथील लसीकरण, रुग्णालयात भरती करणे, रक्तपुरवठा, प्लाझ्मा आणि ऑक्सिजनसाठी गावात प्रमुख मंडळीची मदत घेतली जाते; पण आमगाव येथील प्रत्येक वाॅर्डात नागरिकांचा कोणीच वाली नसल्याने बहुतेक नागरिक स्थानिक पत्रकारांकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. येथील माली, पदमपूर, बनगाव, कुंभारटोली, आमगाव, किडगीपार, बिरसी, आदी प्रभागांत नागरिकांना अनेक समस्या आहेत. वेळेवर नागरिकांसाठी धावून जाणारे मेंबर वॉर्डात नसल्याकारणाने त्यांची दमछाक होत आहे. राजकारण्यांनी आपल्या प्रतिष्ठेसाठी ना ग्रामपंचायत, ना नगर परिषद अशी स्थिती करून नागरिकांना रस्त्यावर सोडून दिले. त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलेला आहे. शासनाने न्यायालयीन प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.