आमगाव : युतीसरकारच्या काळात माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांनी तिगाव - आमगाव रस्त्याचे डांबरीकरण केले. आज जवळपास २० वर्षापासून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नाही. विशेष म्हणजे कार्यरत जिल्हा परिषद अध्यक्ष व दोन जि.प. सदस्यांच्या क्षेत्रात हा रस्ता येतो. मात्र कोणत्याच राजकिय नेत्याचे याकडे लक्ष नाही. अनेकांना या मार्गावर मोठी अडचण निर्माण होत आहे. मात्र नेते व जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. रस्त्याचे डांबरीकरण अंधारात पडले आहे. सन १९९४-९५ या कालखंडात या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र त्यानंतर काहीच दुरूस्ती न झाल्याने येथील मोठे खड्डे वाहनाला आव्हान ठरले आहे. आमगाव जिल्हापरिषद क्षेत्राचे जि.प. सदस्य व अध्यक्ष विजय शिवनकर, चिरचाळबांध जि.प. सदस्य योगेश्वरी मुक्तानंद पटले व ठाणा जि.प. क्षेत्राचे सदस्य टुंडीलाल कटरे यांच्या क्षेत्रात हा रस्ता येतो. सत्ता त्यांचीच आहे मात्र रस्त्याकडे कुणाचेच लक्षकेंद्रीत नाही. या मार्गावर तिगाववरुन समोर मांडोबाईकडे जाणारा मार्ग आहे. येथूनच मोठ्या वाहनांची वर्दळ असते. मात्र या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यांची डागडुजी अजुनपर्यंत झाली नाही.काही दिवसानंतर जिल्हा परिषद निवडणुका येत आहेत. त्यामुळे या कालखंडात या मार्गाचे डांबरीकरण होणार काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जि.प. बांधकाम विभागाचे अधिकारी निधी नाहीच्या नावावर कार्यालयात मौजमजा घेतात. मात्र तात्पुरती डागडुजी करण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही अशी शोकांतीका या मार्गाची आहे. (तालुका प्रतिनिधी)
दोन सदस्यांच्या क्षेत्रातील रस्त्यावर वाली कोण?
By admin | Updated: November 29, 2014 23:23 IST