गोंदिया : कोरोना वगळता, बीपी, शुगर, क्षयरोग, कर्करोग, अपघातातील गंभीर जखमी अशा अनेक आजारांच्या रुग्णांची प्रकृती खालावली, तरी त्यांनी जायचे कुठे? हा पहिला प्रश्न येतो. कुठलाही आजार असो आधी कोविड चाचणी करा, तरच हात लावू, कोविडची लक्षणे नसली, तरीही चाचणी केल्याशिवाय हात लावणार नाही. या डॉक्टरांच्या भूमिकेमुळे इतर आजारांचे रुग्ण हतबल झाले आहेत.
दर आठवड्याला कोविड चाचणी कशी करायची? कोविड चाचणीच्या नादात कोविड पॉझिटिव्ह होण्याची दाट शक्यता आहे. वारंवार चाचणीसाठी गेल्याने संसर्गाचा अधिक धोका संभवतो. सर्वांच्या मुखी कोविड-कोविड हेच सुरू असल्याने इतर आजाराच्या रुग्णांचे जीव टांगणीला लागले आहेत. उपचारासाठी जरी इतर आजाराचे रुग्ण खासगी रुग्णालयात गेले, तर अनेक डॉक्टर त्यांना पाहात नाही. आता खासगी असलेल्या ८० रुग्णालयांत कोविड सेंटर सुरू झाल्याने सर्वांचा कल कोविड आजाराकडेच आहे. परंतु त्या नादात इतर आजारांच्या रुग्णांची फार वाईट अवस्था होत आहे. त्यांना बेडही मिळत नाहीत. अशा काळात अपघाताचे गंभीर रुग्णही जरी हॉस्पिटलमध्ये गेले, तरी त्यांच्याकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाही.
......
११ खासगी रुग्णालयात कोविडचा उपचार
गोंदिया शहरातील ११ खासगी रुग्णालयांत कोविडचा उपचार केला जातो आहे. यात राधेकृष्ण हॉस्पिटल, केएमजे हॉस्पिटल, बाहेकर हॉस्पिटल, गायत्री हॉस्पिटल, सहयोग हॉस्पिटल, मीराबेन हॉस्पिटल, आयुष हॉस्पिटल, बजाज हॉस्पिटल, आयुर्वेदिक कॉलेज, हिलिंग हॅण्ड हॉस्पिटल अशा ११ खासगी हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. या खासगी रुग्णालयांतून शेकडो कोविडच्या गंभीर रुग्णांवर उपचार केला जातो.
.......
दररोज २० ते ३० रुग्णांना जावे लागते परत
सरकारी रुग्णालयात आलेल्या किंवा खासगी रुग्णालयात इतर आजारांसाठी आलेल्या रुग्णांना उपचार न करताच मोकळ्या हाताने परत जावे लागते. बीपी, शुगर, हृदयरोग, क्षयरोग, कर्करोग अशा विविध आजाराच्या रुग्णांना केटीएस, मेडिकल, बाई गंगाबाई व शहरातील अनेक हॉस्पिटलमधून उपचार न करताच मोकळ्या हाताने घरी परतावे लागते. दररोज २० ते ३० रुग्ण घरी परतत असल्याची विदारक स्थिती गोंदिया जिल्ह्यात आहे.
......
रुग्णांची गैरसोय
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक हालअपेष्ठा सहन कराव्या लागत आहेत. त्यातच त्यांचा आजार व वरून डॉक्टरांकडून उपचार होत नसल्याने गैरसोय होते.
......
कोविड उपचार सुरू असलेली खासगी रुग्णालये- ११
शहरातील शासकीय रुग्णालये-३
शासकीय कोविड हॉस्पिटल- ६
शहरातील एकूण खासगी हॉस्पिटल-४८
नॉनकोविडचे बेड उपलब्ध- ३५०
......
कोविडचे ॲक्टिव्ह रुग्ण- ६७८६
इतर आजारांचे सरासरी रुग्ण- १२८०
.......
कोविड रुग्णांची संख्या वेगाने वाढली असली, तरी इतर आजारांच्या रुग्णांनाही पाहिले जाते. त्यांच्यासाठी ३५० बेड गंगाबाई, केटीएस व मेडिकल या तीन शासकीय रुग्णालयात मिळून आहेत. कोणत्याही आजाराचा रुग्ण दगावू नये, असे आमचे ध्येय आहे. कोविडच्या कामात जास्त डॉक्टरांची ड्युटी आहे.
- डॉ. सुवर्णा हुबेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी, केटीएस, गोंदिया.