गोंदिया : महसूल विभागाने ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषदेच्या मालकीच्या बाई गंगाबाई महिला रूग्णालयाजवळ असलेल्या कृषी भवनात आपले कामकाज सुरू केले आहे. एवढेच नव्हे तर तेथे पूर्वीपासूनच असलेल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेला(डायट) पत्र देऊन सदर भवन रिकामे करण्याचे निर्देश दिले आहेत.जिथपर्यंत गोष्ट कृषी भवनाची आहे, याच्या मालकीचे अधिकार जिल्हा परिषदेजवळ सुरक्षित आहेत. या ठिकाणी पूर्वी जिल्हा परिषद कार्यालय व नंतर पंचायत समितीचे कृषी भवन होते. भंडारा जि.प. पासून वेगळे होऊन गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व सभापती यांनी याच ठिकाणी आपले कामकाज सुरू केले होते. आताही कृषी भवनाच्या जवळ पंचायत समितीच्या महिला व बालकल्याण विभागाचे कार्यालय सुरू आहे. काही वर्षांपर्यंत कृषी भवनाच्या वरील माड्यावर व ग्राऊंड फ्लोअरवर कोणतेही कार्यालय नव्हते. त्यामुळे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदियाच्या वतीने सदर कार्यालय भाड्याने देण्याची मागणी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आमसभेत मंजुरी मिळाल्यानंतर ते कार्यालय कुणालाही दिल्या जाऊ शकत होते. त्यामुळे २७ डिसेंबर २०१० च्या जिल्हा परिषदेच्या आमसभेत सदर कृषी भवनाचे ग्राऊंड फ्लोअर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेस देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यासाठी २१ हजार ८०० रूपये भाडे मंजूर करण्यात आले आहे. १ जून २०११ रोजी सदर भवन भाड्याच्या स्वरूपात डायटला जिल्हा परिषदेने हस्तांतरीत केले. तेव्हापासून आतापर्यंत या भवनात डायटचे कामकाज चालत आहे. आत उपविभागीय अधिकारी (महसूल) यांनी कृषी भवनाच्या वरील माड्यावर आपले कार्यालय सुरू केले. विधानसभा निवडणुकीदरम्यान हा सर्व प्रकार करण्यात आला. गोंदियाचे तहसीलदार व उपविभागीय अधिकारी कार्यालयांसाठी नवीन भवनाचे बांधकाम करण्यात येत आहे. त्यासाठी तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांना एका नवीन ठिकाणाची गरज होती. आणि हिच गरज त्या ठिकाणी आपले कामकाज सुरू करून भागविण्यात आली. परंतु ही बाब एवढ्यापर्यंतच सीमीत नाही. गोंदियाच्या तहसीलदारांनी एक पत्र देऊन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेला त्वरित कार्यालय रिकामे करून आपले कार्यालय दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याचे आदेश दिले आहे. आता वरील माड्यावर उपविभागीय कार्यालय आहे तर खाली नायब तहसीलदारांचे कार्यालय आहे. या ठिकाणी नायब तहसीलदार व इतर कर्मचाऱ्यांनी आपला दरबार लावला आहे. (प्रतिनिधी)
कृषी भवनावर ताबा कुणाचा?
By admin | Updated: November 23, 2014 23:20 IST