साखरीटोला : ग्राहकांकडे थकबाकी असल्याची बतावनी करुन साखरीटोला (सातगाव) केंद्रांतर्गत भारनियमन सुरु केल्याने केंद्रांतर्गत गावातील लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे विद्युत विभागाविषयी नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. फिडरवरील भारनियम त्वरीत बंद करण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. काही दिवसांपुर्वी येथील गावकऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता आणि कार्यकारी उपअभियंता यांची भेट घेऊन गाव भारनियमन मुक्त करावे या संदर्भात निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात केली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले होते कि सहा महिन्यांत साखरीटोला गावाला भारनियमन मुक्त करण्यात येईल. परंतु वेळ लोटून सुद्धा गाव भारनियमन मुक्त करण्यात आले नाही. साखरीटोला (पावर हाऊस) विद्युत केंद्राशी संलग्न तीन फिडर आहेत. त्यात साखरीटोला, हेटीटोला, सोनेखारी यापैकी केवळ साकरीटोला फिडरवर भारनियमन सुरु करण्यात आले. यात साखरीटोला, सातगाव, कन्हारटोला, सलंगटोला, रामपूर, पानगाव, अजोंरा, दागोटोला, या गावांना भारनियमनाचा तडाखा सहन करण्याची पाळी आली आहे. यात सकाळी ६ ते ९ व दुपारी ३ ते ६ पर्यंत भारनियमन करण्यात येते, ज्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.मात्र सदर विद्युत केंद्रातील हेटीटोला व सोनेखारी फिडरला भारनियमन नाही. मग साखरीटोला फिडरलाच भारनियमन का लादण्यात आले असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. याविषयी प्रभारी शाखा अभियंता घोरमारे यांना विचारणा केली असता त्यांनी सदर फिडरचे भारनियम विभागीय कार्यालयाच्या निर्देशानुसार थकबाकीदार अधीक असलेल्या गावांना लादण्यात येते. साखरीटोला फिडर केंद्रात थकबाकीदारांची संख्या अधिक असल्याची बतावणी करुन भारनियमन लादण्यात आल्याचे सांगितले.विद्युत विभागाच्या अफलातुन कारभाराविषयी जनतेने नाराजी व्यक्त केली आहे. जे ग्राहक नियमित विद्युत बिलाचा भरणा करतात त्यांचा विचार का केला जात नाही. ग्राहकाने विद्युत बिल वेळेवर भरले नाही तर विद्युत विभागाचे कर्मचारी त्वरीतच त्या ग्राहकांचा विज पुरवठा खंडीत करतात. विद्युत पुरवठा खंडीत केला जाऊ नये म्हणून विज बिल वेळेवर भरले जाते. याचा अर्थ असा की, विद्युत विभागाचे अधिकारी चुकिची माहिती देऊन साखरीटोलावासीयांना नाहक त्रास देत आहेत. भारनियमनामुळे जनता त्रासली असून लादण्यात आलेले भारनियम त्वरीत बंद करण्यात आले नाही तर साकरीटोलावासी रस्त्यावर उतरुन आंदोलन करुन शकतात असा इशारा रमेश चुटे, प्रभाकर दोनोडे, डॉ. संजय देशमुख, डॉ. अजय उमाटे, सुनिल अग्रवाल, संतोष शहारे, संतोष बोहरे, अश९ाक मेहर, अरविंद गजभिये, संजय कुसराम, राजू काडे, सागर काटेखाये, प्रकाश दोनोडे, पृथ्वीराज शिवनकर, किसन चकोले, बबलू लांजेवार, प्रदिप अग्रवाल यांनी दिला आहे.
थकबाकीच्या नावाखाली भारनियमन
By admin | Updated: November 15, 2014 01:49 IST