अर्जुनी मोरगाव : अर्जुनी/मोरगाव येथील प्रादेशिक पाणी पुरवठा योजना १ एप्रिलपासून सुरळीत सुरू आहे. परंतु वाढत्या विद्युत बिलांमुळे १ डिसेंबरपासून सदर योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे.एक महिन्याचे विद्युत बिल एक लाख ७५ हजार रूपये याप्रमाणे दोन महिन्यांचे बिल थकित आहे. यामुळेच सदर योजना बंद होण्याची दाट शक्यता आहे. एका वर्षापूर्वी योजना सुरू करण्यासंदर्भात नवेगावबांध येथे उपोषण करण्यात आले होते. त्यात अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील तिन्ही योजनांची जबाबदारीसाठी उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग नवेगावबांध येथील कनिष्ठ अभियंत्याची निवड करण्यात आली होती. परंतु संबंधित अभियंत्याने आजपर्यंत संपर्क साधला नाही. योजनास्थळी भेटसुद्धा दिली नाही. त्यामुळे योजनाच आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. अर्जुनी/मोरगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेद्वारे एकूण १५ गावांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरविले जाते. परंतु येत्या १ डिसेंबरपासून योजना बंद होण्याच्या मार्गावर असल्याने १५ गावातील नागरिकांना पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून मुकावे लागणार असून पाण्याची टंचाई उद्भवण्याची दाट शक्यता आहे. या योजनेकडे १५ गावे मिळून एक हजार ४०० नळ जोडण्या आहेत. प्रत्येक नळ धारकाकडून दर महिना ८० रूपये वसूल केले जाते. त्यानुसार एक लक्ष १२ हजार रूपये जमे होतात. त्यात मासिक विद्युत बिल एक लाख ७५ हजार रूपये, देखभाल दुरूस्तीसाठी ४० हजार रूपये, कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ६५ हजार रूपये असा खर्च येतो. यावरून जमा रकमेपेक्षा खर्चच अधिक दिसून येतो. त्यामुळे योजना तोट्यात सुरू असून शासनाकडून मिळालेले अनुदान विद्युत बिलांवर पूर्ण खर्च झाले आहे. पुढील विद्युत बिल भरण्यासाठी मंडळाकडे निधी उपलब्ध नाही. त्यामुळे तिन्ही मंडळांनी संयुक्त सभा घेवून जि.प. प्रशासनाने स्वत:कडे हस्तांतरीत करावे, असा ठराव घेतला आहे. सदर ठराव कार्यवाहीसाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि.प. गोंदिया यांना देण्यात आला आहे. (वार्ताहर)
प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद होण्याच्या मार्गावर
By admin | Updated: November 19, 2014 22:55 IST