रुग्णांच्या नातेवाईकांची भटकंती : बोअर महिनाभरापासून बंदगोंदिया : आरोग्य सेवा पुरविण्यात अयशस्वी ठरलेले येथील बाई गंगाबाई रूग्णालय आता साधे पिण्याचे पाणीही पुरेशा प्रमाणात पुरविण्यात कमी पडत आहे. रूग्णालयातील बोअरवेल बंद पडली असून रूग्णालयात पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. रूग्णांच्या नातेवाईकांना पाण्यासाठी भटकावे लागत असल्याचे दिसून येत आहे. शासन कोट्यवधी रूपये खर्च करून आरोग्य सेवा पुरवित आहे. श्रीमंताला शासकीय रूग्णालयात जाऊन उपचार करवून घेण्याची गरज पडत नाही. शासकीय रूग्णालयात धाव घ्यावी लागते ती गरिबांनाच. यामुळेच गरिबांना आरोग्याची सेवा पुरविण्यासाठी शासनाकडून हे शासकीय रूग्णालय चालविले जात आहे. मात्र शासकीय रूग्णालयात रूग्णांचे हाल होत असल्याचे दिसून येते. आजघडीला येथील बाई गंगाबाई रूग्णालयात महिलांना झोपण्यासाठी खाटा कमी पडत असून त्यांना खालीच झोपावे लागत आहे. याहीपेक्षा गंभीर व रक्त खवळून सोडणारी बाब अशी की, रूग्णालयात आलेल्यांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. कोणत्या ना कोणत्या कारणांनी हे बाई गंगाबाई रूग्णालय नेहमीच चर्चेत राहते. येथील अधिकारी व कर्मचारीही आता निगरगट्ट झाले असून त्यांना कुणाच्या जीवाची पर्वाही राहिलेली नाही. आज रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पिण्याचे पाणी हवे असल्यास दूरवर जाऊन पाणी आणावे लागत आहे. प्राप्त माहितीनुसार, रूग्णालयात तीन बोअरवेल आहेत. यातील दोन बोअरवर मशीन लावण्यात आली आहे, तर एका बोअरवेलवरूनच सर्वांना पाणी घ्यावे लागत होते. मात्र मागील महिनाभरापासून ही बोअरसुद्धा बंद पडली आहे. परिणामी रूग्णालयात पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. काहींनी तर आम्ही दूरदूर फिरून पाणी आणल्याचे सांगत रूग्णालय प्रशासनाबद्दल रोष व्यक्त केला. (शहर प्रतिनिधी)अधीक्षकांना फोनची अॅलर्जी?रूग्णालयातील या प्रकाराबाबत अधीक्षक डॉ.संजीव दोडके यांना मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. कुणाची तक्रार किंवा समस्येला घेऊन कुणी त्यांना फोन केल्यास त्यांच्याकडून फोनवर तरी समोरच्या व्यक्तीचे समाधान करणे अपेक्षित आहे. मात्र त्यांनी योग्य प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे रूग्णालयातील कारभाराबाबत किंवा तेथील समस्यांबाबत ते फारसे गंभीर नसल्याचे दिसून येते. रूग्णालयात सर्वत्र घाण रूग्णालय म्हटल्यास किमान येथे तरी स्वच्छता असणे अपेक्षित आहे. मात्र येथील बाई गंगाबाई रूग्णालय बघितल्यास येथील वातावरण रूग्ण व नवजात बाळांसाठी किती पोषक आहे याची प्रचिती येते. सर्वत्र साचलेले सांडपाणी, दुर्गंध व कचरा यातून येथे नाक दाबूनच वावरावे लागते. अशात येथे रूग्णासोबत येणारे त्यांचे नातेवाईक कसे राहात असतील असा प्रश्न साहजिक पडतो. रुग्णालय प्रशासनाला मात्र याचे काहीच घेणे देणे नसल्याचे दिसते.
गंगाबाई रूग्णालयात पाण्यासाठी हाहाकार
By admin | Updated: September 27, 2015 01:18 IST