गोंदिया : तालुक्यातील ग्राम आवारीटोला येथील पाणी पुरवठा योजनेला वीज जोडणी नसल्यामुळे योजना बंद पडून आहे. मात्र आता या योजनेची वीज जोडणीची समस्या सुटणार असून लवकरच योजना सुरू होणार आहे. यामुळे गावकऱ्यांची पाण्याची समस्या सुटणार आहे.
गोंदिया विधानसभा क्षेत्रातील गुदमा हे गाव रेल्वे लाईनच्या दोन मार्गांना विभाजीत आहे. गुदमा येथे पाणी पुरवठा योजना असूनही अर्धे गावकरी आवारीटोला-जानाटोला येथे येत असून तेथे पिण्याच्या पाण्याची पूर्ती होत नाही. यामुळे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नांनी आवारीटोला येथे अतिरीक्त पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली. मात्र योजनेला वीज जोडणी नसल्याने योजना कार्यान्वित नव्हती. यावर गावातील कार्यकर्ते गौरीशंकर खोटेले, ग्रामपंचायत सदस्य भगत व जगने यांनी योजनेला वीज जोडणी मिळावी यासाठी अग्रवाल यांच्याकडे मागणी केली. यावर अग्रवाल यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता वानखेडे व उपकार्यकारी अभियंता जायस्वाल यांच्याशी वीज जोडणीबाबत चर्चा केली. तसेच ्र्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा करून उन्हाळा लक्षात घेत वीज जोडणी प्राधान्याने करवून देण्याची मागणी केली.ऊर्जामंत्र्यांनी यावर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश गोंदिया वीज मंडळाला दिले आहेत.