नागरिकांचा रोष : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण निद्रावस्थेतलोहारा : पावसाळ्यातही खेड्यातील (पुराडा) पाणी पुरवठा योजना मागील पाच महिन्यांपासून खंडित असल्याने नागरिकांमध्ये रोष पसरला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी निद्रावस्थेत असल्यामुळेच पाणी पुरवठा खंडित असल्याचे बोलले जात आहे. ढिसाळ कामामुळे मागील महिन्यात पाईप लाईन अनेक ठिकाणी फुटल्या आहेत. त्यामुळे जनतेला नळ योजनेचा लाभ मिळत नसून ते पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून वंचित झाले आहेत.ग्रामीण भागातील नागरिकांना दिवसातून एकदा तरी पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. ग्रामस्थांना उन्हाळ्याच्या दिवसांत पाणी टंचाईचा सामना दरवर्षीच करावा लागतो. मात्र आता पावसाळा सुरू असूनही पाणी पुरवठा योजना खंडित असल्याने नागरिकांना आश्चर्य वाटत आहे. अनेक ग्रामस्थ विविध चौकात असलेल्या बोअरवेल्सकडे धाव घेत आहेत. शासनाने नळ योजना राबवूनही ती अपयशी ठरल्याचेच दिसून येत आहे. वार्ड-३ मधील बोअरवेल क्रमांक २ मागील दोन महिन्यांपासून बंद पडून आहे आणि नळाला तर पाणीच नाही. त्यामुळे नागरिकांनी काय करावे, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. दोन गुंड पिण्याचे पाणी मिळेत म्हणून ग्रामस्थ तासनतास बोअरवेलजवळ थांबतात व पिण्याच्या पाण्याची सोय करतात.सर्व नागरिक पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या पाणी पुरवठा योजनांवर अवलंबून असतात. मात्र त्यांना पाणी पुरवठा होत नसल्यामुळे नळ योजना बंद करून बोअरवेल्स उपलब्ध करून द्यावे. पाईप लाईन फुटल्यामुळे पावसाळ्यात स्वच्छ पाणी न मिळाल्याने अनेक आजार उत्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाणी पुरवठा विभागाच्या मनमर्जी कारभाराने ग्रामस्थ त्रासून गेले आहेत. कधी पाणी मिळते तर कधी आठवड्यातून एकदाच मिळते, अशी अवस्था आहे. त्यामुळे अनेक नळ ग्राहकांनी नळ बंद करून ठेवले आहेत. (वार्ताहर)
पाच महिन्यांपासून पाणी पुरवठा खंडित
By admin | Updated: September 7, 2015 01:50 IST