गोंदिया : लोकसभेची निवडणूक असो किंवा विधानसभेची, गोंदिया जिल्ह्याच्या मतदार संघात नेहमी कोणत्यातरी सिने कलावंताला रोड शो, रॅली किंवा प्रचार सभेसाठी आणले जाते. या निवडणुकीदरम्यान कोण्यातरी सिने कलावंताला प्रचारासाठी आणले जाईल, अशी जिल्हावासीयांची अपेक्षा होती. मात्र निवडणूक चार दिवसांवर येवून ठेपली असताना आतापर्यंत प्रचारासाठी कोणत्याही सिने कलावंताला गोंदियात आणण्यात आले नाही. त्यामुळे गोंदियातील मतदारांचा भ्रमनिराश झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात गोंदिया, तिरोडा, आमगाव व अर्जुनी/मोरगाव ही चार विधानसभा क्षेत्रे आहेत. आतापर्यंत राष्ट्रीय स्तरावरील दोन मोठे नेते गोंदियात आले. तर तिसऱ्या नेत्याचा अधिवासच गोंदियात असल्याने ते आपल्या पक्षाच्या विजयासाठी सर्वच विधानसभा क्षेत्राच्या प्रचार वाऱ्या करीत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सोनिया गांधी गोंदिया आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रफुल्ल पटेल अख्खा जिल्हा पिंजून काढत आहेत. परंतु यंदाच्या प्रचारात सिने कलावंतांचा अभाव जाणवत आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रफुल्ल पटेलांच्या प्रचारासाठी दोन सिने तारकांना आणून गोंदिया शहरात रोड-शो घेण्यात आला होता. त्यांना बघण्यासाठी शहराच्या रस्त्यांवर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळाली होती. परंतु आता विधानसभा निवडणुकीचा दिवस चार दिवसांवर येऊन ठेपला असताना कोणत्याही मोठ्या पक्षाकडून सिने कलावंतांना रोड-शो किंवा प्रचारसभेसाठी गोंदियात आणण्यात आले नाही. या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कोणत्यातरी सिने कलावंतास गोंदियात आणले जाईल, अशी चर्चा होती. मात्र निवडणुकीचा दिवस जवळ आल्याने व प्रचार कार्यासाठी कोणताही सिने कलावंत न दिसल्याचे नागरिकांचा भ्रमनिराश झाल्याचे दिसून येत आहे.
मतदारांना सिने कलावतांची प्रतीक्षा
By admin | Updated: October 11, 2014 23:10 IST