पार्ट्यांची वाढली धूम : तरूणांना खूश करण्याचे प्रयत्न गोंदिया : निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशे प्रचारासह पार्ट्यांचे आयोजन वाढत चालले आहे. निवडणुकीनंतर ज्या मतदारांना पाच वर्षे नेत्यांच्या मागे फिरावे लागणार आहे. त्याच मतदारांना खुश करण्यासाठी या नेतेमंडळींकडून पार्ट्यांचे आयोजन करून सरबराई केली जात आहे. विशेष म्हणजे यात तरूणांना खुश करण्यावर जास्त भर आहे. कारण हेच तरूण प्रभागात कामी पडणार असल्याने सध्या पार्ट्यांची धूम वाढली आहे. येत्या ८ तारखेला नगर परिषदेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे शहरात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. शहरात सर्वत्र निवडणुकीच्याच चर्चा असून उमेदवारांनाकडून प्रभागातील एक-एक घर गाठणे सुरू आहे. शिवाय प्रभागात कुणाचे सर्वाधीक संबंध आहेत अशा व्यक्तींना पकडून मतदारांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून केला जात आहे. या कामासाठी त्या व्यक्तींनाही तसेच कार्यकर्त्यांना खुश ठेवणे गरजेचे असल्याने त्यांच्यासाठी पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. विशेष म्हणजे प्रचाराच्या या कामासाठी प्रभागातील तरूणांचा जास्त वापर व त्यांच्याकडून फायदाही होत असल्याने उमेदवारांकडून प्रभागातील तरूणांना आपल्याकडे करण्याचे कार्य केले जाते. यासाठी या तरूणांच्या घोळक्यात उठबस करणे व त्यांच्याशी जवळीक साधण्याचे काम सुरू आहे. यासाठीही या तरूणांना खुश ठेवणे गरजेचे आहे. शिवाय मतदारांनाही खुश ठेवण्यासाठी उमेदवार पार्ट्यांचे आयोजन करीत आहेत. यासाठी काही हॉटेल्स किंवा ढाबे निवडून ठेवण्यात आले आहेत. तर काहींनी आपल्या काही खास जागांवर आपले किचनच थाटून ठेवले आहे. प्रभागातील १०-२० तरूणांचा घोळका पार्टीसाठी तयार करून त्यांना ठरविलेल्या जागेवर पाठवून त्यांची सर्व व्यवस्था तेथे केली जात आहे. आता निवडणुकीला काहीच दिवस असल्याने या पार्ट्यांची धूम चांगलीच वाढली आहे. विशेष म्हणजे सर्वच उमेदवारांकडून पार्ट्यांचे आयोजन केले जात असतानाच तरूणांकडूनही पार्ट्यांची मागणी केली जात आहे. सध्या शहरात बघावे तेथे पार्ट्यांच्याच चर्चाही रंगल्या आहेत. येत्या ८ तारखेपर्यंत हे रिंगणातील हे उमेदवार मतदारांच्या मागे फिरणार. त्यानंतर मात्र सामान्य जनतेलाच निवडून आलेल्यांच्या मागे फिरावे लागणार असल्याने मतदार ही शहाणा झाला असून उमेदवारांची चांगलीच गुगली घेत आहे. (शहर प्रतिनिधी) कार्यालयांमध्येच किचनची व्यवस्था ४निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या काही उमेदवारांकडून प्रचार कार्यालय उघडण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कार्यालयात येणाऱ्या मतदार व कार्यकर्त्यांसाठी कार्यालयातच किचनची व्यवस्था करण्यात आली आहे. कुणीही कार्यालयात आल्यास त्याच्या चहा-नाश्त्याची व्यवस्था लगेच तेथेच होत आहे. यात समोरची व्यक्ती नाराजही होत नाही. शिवाय ही व्यवस्था परवडणारीही ठरते. त्यामुळे उमेदवारांच्या कार्यालयात गर्दीही चांगलीच दिसून येत आहे.
पार्ट्यांमधून मतदारांची सरबराई
By admin | Updated: December 26, 2016 00:43 IST