सालेकसा : भारत निवडणूक आयोग स्वीप-२ कार्यक्रमांतर्गत तहसील कार्यालय सालेकसाच्या वतीने तहसीलदार प्रशांत सांगळे यांच्या मार्गदर्शनात मतदार आणि मतदान नोंदणी जनजागृती अभियान राबविण्यात येत असून मतदार नोंदणी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शंकरलाल अग्रवाल विज्ञान महाविद्यालय सालेकसा येथे मार्गदर्शन व नोंदणी कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला युवा विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व आपला सक्रीय सहभाग नोंदविला. मतदानास पात्र युवांमध्ये मतदानाविषयी जागृती व्हावी, यासाठी शासनातर्फे आदेश निर्गमित करुन महाविद्यालयामध्ये उपक्रम राबविण्याचे आदेश देण्यात आले आहे. तहसीलदार प्रशांत सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रम प्रामुख्याने प्राचार्य डॉ. अर्पणा सुरसेल, नोंदणी प्रभारी प्रा. संजय बिरनवार, प्रा. अविनाश डोणगापुरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. मंगेश खोब्रागडे उपस्थित होते. प्रास्ताविकात प्रा. संजय बिरनवार यांनी शासनाच्या आदेशाप्रमाणे त्वरित दखल घेत प्राचार्य सुरसेल यांच्या तत्परतेमुळे मतदान नोंदणी जलद गतीने होत असल्याचे सांगितले. यावेळी तहसीलदार प्रशांत सांगळे म्हणाले, युवा वर्गाने जगातल्या सर्वात मोठ्या लोेकशाही राष्ट्रातील लोकशाही समृद्ध करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा, हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट असल्याचे नमूद केले. मतदार यादीत आपले नाव नोंदविण्यात आलेल्या नवीन मतदारांना ओळख वाटप करण्यात आले. या वेळी नायब तहसीलदार एस.एन. बारसागडे यांनी मतदान ओळखपत्र दिले, ते तहसीलदार सांगळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. संचालन डी.एल. राऊत यांनी केले. आभार एस.बी. गजभिये यांनी मानले. कार्यक्रमासाठी श्रीनू वई यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
विज्ञान महाविद्यालयात मतदार जनजागृती अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2016 00:15 IST