नळ योजनांची व्यथा : अभियंता व कंत्राटदाराचे संगनमतकाचेवानी : वीस वर्षापूर्वी तयार करण्यात आलेली नळ योजना कुचकामी ठरल्यानंतर २०१४-१५ मध्ये नव्याने मंजूर झालेली नळ योजना कुचकामी ठरण्याच्या मार्गावर दिसून येत आहे. कामे अपूर्ण असतांना पूर्ण झाल्याचे दाखवून कंत्राटदार आणि कनिष्ठ अभियंता ग्रामपंचायतकडून पैशांची उचल करीत आहेत. या गावाचेच दुर्दैव म्हणावे लागेल की दोन नळ योजना लाभल्या असूनही गाव तहानलेलेच आहे. गावकऱ्यांच्या तोंडात थेंबभर पाणी पडत नाही. सन १९९३-९४ मध्ये नळ योजना तयार करण्यात आली. मात्र ती नळ योजना कुचकामी ठरली. या योजनेची पाण्याची टाकी शोभेची वस्तु म्हणून पाहिली जावू शकते. त्यानंतर सन २०१४-१५ मध्ये ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत ८० लक्ष रुपयांची नळ योजना मंजूर करण्यात आली. या योजनेची पाण्याची टाकी काचेवानी बस स्टॉप परिसरात तयार करण्यात आली. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ६३ लक्ष रुपयांचे काम केल्याचे दाखविण्यात आले. रामाटोला आणि टिकारामटोला ही दोन्ही लहान गावे काचेवानी येथे समाविष्ट झाल्याने पुन्हा १५ लक्ष रुपयांचा वाढीव निधी मंजूर करण्यात आल्याने सद्यस्थितीत ९५ लक्ष रुपयांची योजना झाली. तरी दोन ते तीन वर्षात पूर्ण झालेली नसून केव्हा पूर्णत्वाकडे जाईल याचीही शंकाच आहे. आतापर्यंत रामाटोला व टिकारामटोला पाण्याची टंकी तयार झालेली नाही.पाईप लाईन घालण्यात आली नाही. १०० च्या वर घरगुती नळ तयार करण्यात आले नाहीत. पाण्याचे स्त्रोत असलेल्या तीन-चार महिन्यापूर्वी तीन पंप लावण्यात आले. मात्र, सुरू होण्याच्या पूर्वीच दोन पंप बंद पडून आहेत. विहीरीवर येण्या-जाण्याची पायवाट तयार करण्यात आली नाही. स्विचरुम (कंट्रोलरुम) ला जाण्या-येण्याचा रस्ता तयार करण्यात आला नाही. विहीरीपासून गावातील पाणी टंकीपर्यंत पाईप लाईन पूर्णत: लिकेज आहे. येथील हायवे क्रॉसींगचे संपूर्ण काम अपुर्ण आहेत. पाण्याच्या विहीरीपासून टंकीपर्यंत एअरवॉल देण्यात आले नाहीत. असे अपूर्ण कामे असतांना खोटे व चुकीचे एम.बी.तयार करून कनिष्ठ अभियंता प्रशांत टेंभुर्णीकर ग्रा.पं.ला पत्र देऊन कंत्राटदारास बिलाची रक्कम देण्यात यावे असे सुचवित असल्याचे नागरिक व ग्रा.पं.पदाधिकाऱ्यांनी सांगीतले आहे. नळ योजनेचे काम समाधान कंन्ट्रक्शनला देण्यात आले असून कामाची देखरेख अभियंता टेंभुर्णीकर यांच्याकडे आहे. आतापर्यंत ७१ लक्ष रुपये खर्च झाल्याचे कंत्राटदार व अभियंता सांगतात. मात्र एवढेच मोठे काम अपूर्ण असताना रुपये खर्च झाले कसे? तसेच उरलेल्या रकमेत मोठ्या प्रमाणात उरलेली कामे कशी होणार याची चिंता नागरिकांत आहे. काम व्यवस्थीतरित्या पूर्ण झाल्याचे सांगून अभियंता टेंभुर्णीकर यांनी ग्रा.पं.ला आठ लाख रूपये कंत्राटदारास देण्याचे पत्र दिले. कामे अपूर्ण असल्याने आणि पंप शुरु न झाल्याने ग्रा.पं.सदस्य संदीप अंबुले सहीत अनेकांनी विरोध दर्शवला. यावेळी पाईप लाईन सुरु झाल्याचे ठेकेदाराद्वारे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात पाहणी केले तेव्हा एक पंप सुरू झाला असून दोन बंद पडून होते. काचेवानी ग्रा.पं.अंतर्गत रामाटोला, टिकारामटोला, रेल्वे व बसस्टॉप परिसर आणि फकीरटोली येथे आजही पाणी टंचाई आहे. पिण्याच्या पाण्याची पातळी खालावल्याने बोअरवेल व विहीरीत पाणी कमी झाले आहे. काही बोअरवेल मधून गढूळ पाणी निघत आहे. (वार्ताहर)चौकशी व कारवाई कराकेलेल्या कामाची व खर्ची दाखविण्यात आलेल्या कामाची चौकशी करुन प्रशासकीय चौकशी करून दोषी आढळल्यास पोलिसात गुन्हा दाखल् करण्यात यावा अशी मागणी ग्रा.पं.सदस्य संदीप अंबुले, राजकुमार कटरे, सोहन कटरे, अशोक वाघाडे, पप्पु भालोटिया, लक्ष्मीचंद चौधरी, भाऊदास तुमसरे, रुपचंद बिसेन, संतोष चौधरी आणि कैलाश जांभुळकर यांनी केली आहे.
दोन योजनांचे गाव तहानलेलेच
By admin | Updated: April 25, 2017 00:50 IST