माहिती अधिकाराचे उल्लंघन : पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न सौंदड : येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ जिल्हापरिषद क्षेत्र अंतर्गत पं.स. सडक अर्जुनीच्या तालुका ठिकाणातील असलेले हे पशुवैद्यकीय रूग्णालय नसून पैसे कमविण्याचे ठिकाण असल्याचे समोर आले आहे. पशुवैद्यकीय शासकीय इमारतीच्या मागील आवारातील जागेत सागवन जातीचे झाडे होते. मात्र डॉ.पी.पी. मारगाये (राज्य पुरस्कृत पशुवैद्यकीय अधिकारी) यांनी कुणाचीही परवानगी न घेता येथील सागवनची दोन झाडे तोडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. संबंधित विषयावर माहिती अधिकाराचे अर्ज विशाल कृष्णकुमार उजवने यांनी २४ मार्च २०१७ ला त्यांना दिले. मात्र सदर डॉ. यांनी शिवीगाळ करीत मारण्याकरिता हात उचलला व पाहून घेण्याची धमकी दिली, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. यावर उजवणे यांनी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली आहे. डुग्गीपार पोलीस ठाणे येथे लिखित माहिती दिली व डॉ. कांबळे यांना सदर घटनेची माहिती दिली. सडक-अर्जुनी येथील पशुधन विस्तार अधिकारी यांना माहिती दिली. शासकीय जागेतील झाडांची नकाशामध्ये नोंद नसल्याने आम्ही काहीही कारवाई करु शकत नाही, असे त्यांनी सांगितले. तर नियम फक्त शेतकऱ्यांनाच लागू असतात का? शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतातील लाकडे कापण्याकरिता परवानगी घ्यावी लागते, मग यांना का नाही? अशाही प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दिलेल्या माहितीवर कारवाई होत नसल्याने कुठे तरी भ्रष्टाचाराचे गालबोट लागले असावे, अशी शंका उजवने यांनी व्यक्त केली आहे. सदर प्रकरणाची त्वरित चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विशाल उजवने यांनी केली आहे. हा सर्व प्रकार दाबण्याचा प्रयत्न चालू आहे व सदर शासकीय रूग्णालयातील सागवनचे बूड जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न डॉ. मारगाये करीत आहेत, असा आरोपही उजवने यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाकडे वरिष्ठांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. याबाबत आरएफओ युवराज यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले, कुठल्याही जागेतील सागवनाचे झाड कापण्याकरिता कापण्यापूर्वी परवानगी घ्यावे लागते. मात्र परवानगी न घेतल्यास तो गुन्हा ठरतो, असे म्हणाले. तर तालुका पशुधन विस्तार अधिकारी यांनी मी माझ्या स्तरावर काही कारवाई करू शकत नाही. पण त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची दबंगगिरी
By admin | Updated: April 20, 2017 01:14 IST