गोंदिया : निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्ष व उमेदवारांच्या प्रचारासाठी आधीच चारचाकी वाहने बुक केलेली असतात. यंदा मात्र आतापर्यंत वाहने उमेदवारांनी नामांकन परत घेण्याच्या तारखेपर्यंत बुक झाली नसल्याची माहिती शहरातील सोनाली ट्रान्सपोर्टचे महेश गुप्ता यांनी दिली.निवडणुकीत गैरप्रकार होवू नये, ही प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असते. त्यामुळे पोलीस बंदोबस्तसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाने सोनाली ट्रान्सपोर्टच्या २० टाटा सुमो सारखी हलके वाहने व जवळपास १० मेटॅॅडोअर बुक करण्यात आले. शासकीय कामासाठी गाड्या लावल्या तर शासनाचे पैसे विलंबाने मिळत असले तरी मिळणार याची शाश्वती असते. परंतु उमेदवारांसाठी वाहने लावली तर भाडे मिळेलच याची शंका असते. त्यामुळे आम्ही शासकीय कामासाठी सदर वाहने लावल्याची माहिती गुप्ता यांनी सांगितली. काही पक्षांच्या वतीने १ आॅक्टोबरपासून वाहन ठरविण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बोलणी केली होती. परंतु आम्ही अॅडव्हान्स रकमेची मागणी केल्यावर त्यांच्याकडून आतापर्यंत कसलेही उत्तर आले नाही. १ आॅक्टोबर ही नामांकन उचल करण्याची अंतीम तारीख असल्यामुळे कदाचित वाहने ठरविण्यात आली नसावी. मात्र निवडणुकीच्या रिंगणात ठराविकपणे एकूण किती उमेदवार आहेत, हे कळल्यानंतरच पक्षातर्फे किंवा उमेदवारांकडून वाहन ठरविले जाते. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच किती वाहनांची मागणी होते, हे कळू शकेल. माझ्याकडे सध्या एकूण १९ वाहन आहेत. ते सर्व अदानी पॉवरमध्ये कामासाठी लावले आहेत. कंपनीकडून कराराची रक्कम मिळण्याची शाश्वती असते, त्यामुळे आम्ही उमेदवारांच्या प्रचार कार्याला प्राधान्य न देता कंपनीमध्ये गाड्या लावल्या आहेत, असे ते म्हणाले. याशिवाय लहान-मोठे हलक्या वाहनधारकांचे मालक आमच्याकडे येतात व आपले वाहन लावून देण्यासाठी सांगतात. परंतु आम्ही त्यासाठी ५ टक्के रक्कम घेत असल्यामुळे ते आमच्याकडे न येता रक्कम वाचविण्यासाठी सरळ उमेदवारांशी संपर्क करून आपापली वाहने लावून घेतात. तसेच लोकसभा निवडणुकीसारखी विधानसभेची निवडणूक मोठी नसते. क्षेत्र व माध्यमांची गरजच कमी असते. त्यामुळे प्रचार कार्यासाठी किती वाहने लागली किंवा लागणार आहेत, याची माहिती मिळणे कठीण आहे, असे गुप्ता म्हणाले. (प्रतिनिधी)
प्रचारासाठी वाहनांची बुकिंग रखडली
By admin | Updated: October 1, 2014 23:24 IST