परसवाडा : धावत्या जगात वावरताना झटपट काम उरकण्यासाठी व संपर्कासाठी अलीकडे मोबाईलचा वापर होऊ लागला. पण अत्याधुनिक मल्टीमीडियाच्या सॉफ्टवेअरमुळे अनेक काळ्याधंद्यांना ऊत आला आहे. मोबाईल वापराच्या मूळ हेतूला हरताळ फासत त्याचा दुरूपयोग अधिक प्रमाणात होवू लागले आहे. श्रीमंत बापाच्या लाडक्या पोरांनी वर्गातील इतर हुशार विद्यार्थ्यांना बिघडून टाकले आहे. मोबाईलमधील ब्लू-टुथमुळे एकाकडून दुसऱ्याकडे झटक्यात एसएमएस व कोणतेही व्हीडीओ तर सर्रास पाठविले जाते. कॉलेज कुमारांकडे अश्लील चित्रफीतची साठवण असते. असे अनेक प्रकार शिक्षकांना व पालकांना माहिती नसल्याने भावी विद्यार्थी वाईट संस्काराची शिदोरी घेऊन आपले भविष्य घडवतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळा व महाविद्यालयीन आवारात मोबाईल बंदीला सध्या केराची टोपली दाखविण्यात येत असून, शिक्षक आणि विद्यार्थी वर्गातून मोबाईलचा वापर मुक्तपणे करीत आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने मोबाईलच्या तालावर बिनधास्त वावरणारी मंडळी शाळा व महाविद्यालयाच्या आवारात दिसत आहेत. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर याचा परिणाम होत असल्याने सुज्ञ व सुजान पालकांतून नाराजी व्यक्त होत आहे. महाविद्यालयीन तरूण, तरूणीबरोबर प्राध्यापकांनी तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकही खुलेआम मोबाईलचा वापर करीत आहेत. यामुळे शिक्षणावर परिणाम होत असून शैक्षणिक दर्जा खालावत चालला आहे. असे होऊ नये, यासाठी शासनाने यावर निर्बंध लादले आहे. असे असताना शाळा, महाविद्यालय परिसरात आजही मोबाईलचा सर्रास वापर होत आहे. रिंगटोन्स, कॉलरटोन्स आणि एमपीथ्री गाण्यांच्या तालात गोंधळ घालणारी व विशिष्ट रिगटोन्सने मुलींची छेडखाणी करणारी युवा पिढी तालुक्यातील महाविद्यालयीन आवारात दिसून येत आहे. महाविद्यालयीन प्रशासनानेही मोबाईल वापराचा विशेष असा बाऊ न केल्याने परिसरात अध्ययन कार्य सोडून मोबाईल गेममध्ये गर्क राहणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्राध्यापक वर्गातही मोबाईलचे वेड पहावयास मिळत आहे. भर वर्गात मोबाईलवर कित्येक वेळा गप्पा मारणारे प्राध्यापक मुलांना केव्हा शिकविणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी आता माध्यमिक, हायस्कूलचे विद्यार्थीही मोबाईल घेऊन शाळेत जात आहेत. एकवेळ गृहपाठाची वही घरी राहिली तरी चालेल, पण मोबाईल विसरायला नको, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कधीही संपर्क साधता येतो, त्यामुळे काळजी वाटत नाही. या उद्देशाने मुलांना मोबाईल देणाऱ्या पालकांनी याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. (वार्ताहर)
मोबाईलच्या वापराने शैक्षणिक दर्जा खालावला
By admin | Updated: July 15, 2015 02:16 IST