गोंदिया : लोकसेवकपदाचा दुरूपयोग करून लक्षावधींची अपसंपदा संपादीत करणाऱ्या दोघा भावंडांना न्यायालयाने चार वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील मांडोखाल येथील हे प्रकरण आहे. सविस्तर असे की, रायगड जिल्ह्यातील उरण पंचायत समितीत कार्यरत असताना तत्कालीन विस्तार अधिकारी दिलीप लक्ष्मण भोवते यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून अपसंपदा संपादीत केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती. त्या आधारे भोवते यांच्या संपतीची चौकशी करण्यात असता त्यात अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील मांडोखाल निवासी दिलीप भोवते यांनी स्वत:च्या व त्यांचा भाऊ अशोक भोवते याच्या नावावर २५ लाख ६६ हजार ७०३ रूपयांची अपसंपदा धारण केल्याचे निष्पन्न झाले. यावर दोघांविरोधात अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यात कमल १३(१)(ई),१३(२) लाप्रका, सहकलम १०९ भादंवी अंतर्गत गुन्हा दाखल करून २४ नोव्हेंबर २००८ रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. प्रकरणी विशेष न्यायाधीश एस.आर.त्रिवेदी यांनी ३० आॅगस्ट रोजी दिलीप भोवते यास चार वर्षे सश्रम कारावास व १० हजार रूपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास. तसेच अशोक भोवते यास चार वर्षे सश्रम कारावास व १० हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. (शहर प्रतिनिधी)
दोघा भावंडांना भोवली अपसंपदा
By admin | Updated: August 31, 2016 00:14 IST